सुरूंग, बॉम्ब शोधांसाठी कुत्र्यांची पलटण

काबूल दि.२० – जगातील सर्वाधिक सुरूंग आणि बॉम्ब पेरलेला देश म्हणून अफगाणिस्तानचे नांव घेतले जात आहे. गेली तीन दशर्क युद्धाच्या खाईत जळत असलेल्या या देशातील २०१४ पासून नाटो फौजा काढून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे आता देशवासियांचे तालिबान्यांनी पेरलेले सुरूंग आणि रस्त्याकडेने पेरले गेलेले बॉम्ब यापासून संरक्षण करण्यासाठी दोनशे कुत्र्यांची पलटण अफगाणिस्तानात सज्ज झाली असल्याचे लष्करी अधिकार्यां कडून सांगण्यात येत आहे.

माणसाचा सर्वोत्तम मित्र असलेला कुत्रा याकामी कशी कामगिरी बजावतो हा उत्सुकतेचा विषय ठरला असून काबूलमधील अध्यक्षनिवासापासून थोड्या अंतरावर असलेल्या माईन डिटेक्शन डॉग्ज सेंटरवर दररोज या कुत्र्यांना बॉम्ब शोध आणि स्फोटके व भूसुरूंग शोधासाठी प्रशिक्षित करण्याचे काम सुरू आहे. १८ महिन्यांचे हे प्रशिक्षण आहे.

या प्रशिक्षणाचे प्रमुख अब्दुल जाबर बसेर याविषयी बोलताना म्हणाले की माणसापेक्षा कुत्र्यांची सुरूंग शोधण्याची क्षमता मोठी असून त्यांना कोणतेही प्रशिक्षण दिले तरी ते ती चांगले आत्मसात करतात. आजही अफगाणिस्तानात दररोज २५ ते ३० नागरिक भूसुरूंग, रस्त्याकडेचे बॉम्बस्फोट यात ठार होत आहेत. तालिबान्यांनी पेरलेली ही स्फोटके शोधून काढून नष्ट करणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. कुत्री जमिनीत पाच इंच खोलवर पुरलेली स्फोटकेही शोधू शकतात तसेच मेटल डिटेक्टर जेथे कुचकामी ठरतो असे प्लॅस्टीक भूसुरूंगांचाही ती शोध घेऊ शकतात.अफगाणिस्तानात सर्वाधिक मृत्यू या बॉम्ब आणि सुरूंग स्फोटातून झाले आहेत आणि हेात आहेत.

अमेरिकेच्या पाठिंब्यावर कार्यरत असलेल्या नाटो फौजा २०१४ पर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे अफगाणी जनतेच्या संरक्षणाची तयारी आम्ही आत्तापासून सुरू केली असून त्यासाठीच कुत्र्यांची ही पलटण तयार करण्यात येत आहे. अफगाणिस्तानात रशिया, पाक, इटली, चीन, इराण या देशातून बनलेले सुरूंग, स्फोटके अनेक ठिकाणी तालिबान्यानी पुरली आहेत आणि ती आम्हाल नष्ट करायची आहेत असेही बसेर यांनी सांगितले.