राजू शेट्टी यांचा जामीन मंजूर

बारामती: ऊस दरावरून आंदोलन झेडणारे शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी सतीश काकडे यांची सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर मुक्तता केली. मात्र शेट्टी आणि काकडे यांनी आरोपपत्र दाखल होईपर्यंत बारामती, दौंड आणि इंदापूर येथे न जाण्याबरोबरच प्रक्षोभक भाषणे न करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

साखर कारखान्यांकडून उसाला २४०० रुपये प्रती टनाची पहिली उचल मिळावी; या मागणीसाठी शेतकरी संघटनेने उग्र आंदोलन छेडले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बारामती आणि राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरात संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यासाखर उत्पादक पट्टयात जोरदार आंदोलने झाली. त्यातच शेट्टी, काकडे, सदाभाऊ खोत या प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाची सूत्रे आपल्या हातात घेऊन त्याला विस्कळीत आणि हिंसक वळण लागले. खोत यांची न्यायालयाने गुरुवारीच मुक्तता केली; तर शेट्टी आणि काकडे यांचा जामीन शुक्रवारी मंजूर झाला.

हिंसक आंदोलन हा संघटनेचा मूळ उद्देश असून यापुढे अहिंसक आणि सनदशीर मार्गाने आंदोलन चालविले जाईल अशी ग्वाही खोत यांनी दिली मात्र तूर्तास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आंदोलन स्थगित केले जाण्याची शक्यताही संघटनेच्या सूत्रांनी व्यक्त केली.

Leave a Comment