तीन दशकांच्या व्यवसायानंतर जपानी वाहन उत्पादक कंपनी सुझुकी मोटर कार्पोरेशनने यूएस मार्केटमधून बाहेर पडत असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अन्य जपानी कंपनी साब ऑटो व इसुझु मोटर्स लिमिटेड या कंपन्यांनाइतका फायदा या व्यवसायातून सुझुकीला कमावता आलेला नसल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे. सुझुकीच्या नव्या कारची विक्री यूएस मार्केटमध्ये या पुढे होणार नसली तरी कंपनी मोटरसायकल, ऑल टेरिन व्हेईकल्स व बोटमोटर्सची विक्री मात्र सुरूच ठेवणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यूएस मार्केटमधून सुझुकी बाहेर
कंपनीच्या यूएस वितरकांनी दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी अर्ज केला आहे असेही समजते. १९८५ मध्ये यूएस बाजारपेठेत उतरलेल्या सुझुकीला म्हणावे तसे यश आजपर्यंत कधीच हाती लागलेले नाही. त्यामानाने टोयोटा व होंडा कंपन्यांनी यूएसमध्ये चांगला व्यवसाय करून आपले पाय रोवले आहेत. सुझुकीचे टोकियोतील जनरल मॅनेजर सतोशी युझाकी यासंबंधात बोलताना म्हणाले की, नुकसानीच्या बाजारपेठेत राहण्यापेक्षा आम्ही आमचा चांगला व्यवसाय असलेल्या भारताच्या व आशियाई देशांच्या बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. यूएस बाजारात कंपनीचा वाटा ०.२ टक्क्यांवर आला आहे त्यातुलनेत टोयोटोचा वाटा १४ टक्के आहे.
सुझुकीने सामुराई हे पहिले वाहन यूएस बाजारात आणले होते. हेच मॉडेल भारतात जिप्सी या नावाने प्रसिद्ध होते.
