अमेरिकेत रामानुजन् महोत्सव

ramanuj

गतवर्षी भारतामध्ये जागतिक कीर्तीचे भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन् यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली आणि भारत सरकारने गणितावर अधिक संशोधन करण्यासाठी रामानुजन् अध्यासन निर्माण केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हे वर्ष भारतामध्ये गणितवर्ष म्हणून साजरे केले जाईल, अशी घोषणा केली. केंद्र सरकारने या असामान्य बुद्धीच्या शास्त्रज्ञाची अशी कदर केलेली आहे. परंतु भारतातल्या किती लोकांना रामानुजन् यांची खरी माहिती आहे हा एक संशोधनाचाच विषय ठरणार आहे. इतकी आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञांची आणि तंत्रज्ञांची उपेक्षा केली जात असते. अमेरिकेत मात्र रामानुजन् यांना ओळखले जाते आणि रामानुजन् यांनी प्रस्थापित केलेल्या काही सूत्रांवर अमेरिकेत सातत्याने संशोधन केले जाते.

अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठात भारतापेक्षा सुद्धा अधिक उत्साहाने रामानुजन् – १२५ असा उत्सव साजरा केला जात आहे आणि या निमित्ताने गेल्या सोमवारपासून तीन दिवसांची रामानुजन् परिषद भरवली गेलेली आहे. फ्लोरिडा विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक कृष्णस्वामी अल्लादी आणि फ्रॅन्क गार्व्हन यांच्या सोबतच पेन्सिल्व्हानिया विद्यापीठातील आय जा यी यांनी या परिषदेच्या आयोजनात पुढाकार घेतलेला आहे. या परिषदेमध्ये ७० गणितज्ज्ञ सहभागी होणार असून ते रामानुजन् यांच्या सूत्रांवर आणि त्या सूत्रांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या संशोधनावर सशोधनपर प्रबंध सादर करणार आहेत.

अमेरिकेतील गणितज्ज्ञ जॉर्ज अॅन्ड्रूज, रिचर्ड अस्थि आणि ब्रूस बनर्ट या तिघांची या परिषदेत व्याख्याने होणार आहेत. त्याशिवाय ४० लघु प्रबंध सादर होणार आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा या विद्यापीठात गेल्या २० वर्षांपासून रामानुजन् यांच्या गणिती सूत्रावर संशोधन केले जात असून ते या विषयातील संशोधनाचे मुख्य केंद्र बनलेले आहे. १९८७ साली भारतामध्ये रामानुजन् जन्मशताब्दी साजरी झाली, परंतु त्याच वर्षी अमेरिकेत सुद्धा ही जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली होती आणि तेव्हापासून रामानुजन् यांच्या सूत्रांवरील संशोधनाला गती आलेली आहे, अशी माहिती प्रोफेसर कृष्णस्वामी अल्लादी यांनी दिली.

सध्या फ्लोरिडा विद्यापीठात सुरू असलेल्या रामानुजन्-१२५ या परिषदेला अमेरिकेतील यूएस नॅशनल सायन्स फौंडेंशन, नॅशनल सिक्युरिटी एजन्सी आणि पेन्सिल्व्हानिया स्टेट युनिव्हर्सिटी यांनी आर्थिक मदत केलेली आहे. या परिषदेतील प्रबंधांचे मुद्रण करून त्यांचा संग्रह प्रसिद्ध केला जाणार आहे. गणितावर संशोधन करणार्याे विविध देशातील तज्ज्ञांनी आतापासूनच या संग्रहाची मागणी नोंदलेली आहे. अशा रितीने भारताच्या या थोर गणितज्ज्ञाला अमेरिकेत मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.

Leave a Comment