‘सँडी’ पाठोपाठ अमेरिकेत नव्या वादळाची चाहूल

न्यूयॉर्क: सँडी चक्रीवादळाने झालेल्या अपरिमित नुकसानातून सावरण्यापूर्वीच अमेरिकेवर आणखी एका संकटाचे सावट पसरले आहे. नजीकच्या कालावधीतच अमेरिकेला आणखी एका चक्रीवादळाला सामोरे जावे लागेल; असा इशारा अमेरिकन हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्याप्रमाणे पूर्व किनार्‍यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्व किनार्‍यावर आणखी एक चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान शास्त्र विभाने वर्तविली आहे. मात्र हे वादळ नेमके कधी निर्माण होईल आणि त्याची तीव्रता किती असेल; याबाबत अजून अंदाज आलेला नाही.

नुकत्याच अमेरिकेत थैमान घालणाऱ्या सँडी वादळाने हाहा:कार उडवून दिला होता. त्याच्या दणक्यातून अमेरिकन नागरिक अजूनही सावरलेले नाहीत. या वादळामुळे न्यूयॉर्क मेट्रोपॉलीटीन विभागात कडाक्याची थंडी पडलेली आहे. बहुसंख्य घरे आणि कार्यालयात अद्याप वीज पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. निर्वासितांना दिवसा वॉर्मिंग सेंटरमध्ये तर रात्री सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक सामुग्री नागरिकांना पुरविण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आणि नुकसानीच्या व्याप्तीमुळे दुरुस्तीचे काम आणखी काही महिने पूर्ण होऊ शकणार नाही.

या पार्श्वभूमीवर नव्या वादळाच्या शक्यतेने अमेरिकन नागरिक धास्तावले आहेत.