शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी

कराड: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेतून निवडून येतात. ‘वरून’ लादले जात नाहीत; अशी कोपरखळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्या गावातच मारली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुंड आहेत; हे समजायला काँग्रेस प्रदेशाध्याक्षाना एवढी वर्ष का लागली; असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला

पी. डी. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेस हा आमचा मोठा भाऊ आहे. आम्ही लहान आहोत. त्यामुळे आमची कोणाबरोबर स्पर्धा नाही. मात्र ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या राष्ट्रवादीची आहे; याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अजित पवार यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्याबाबत पक्षाच्या पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल; असेही पवार म्हणाले.

डहाणू येथे प्रचारसभेत बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सर्वाधिक गुंड राष्ट्रवादीचे; असे विधान केले होते. पवार यांनी त्याचा काक समाचार घेतला. आमचा पक्ष गुंडा-पुंडाचा आहे; हे समजत असेल तर ८ वर्ष आमच्याबरोबर काय करता; असा सवालही त्यांनी केला.