परिपक्वता आवश्यक

अरविंद केजरीवाल यांनी काल रिलायन्स इंडस्ट्रीवर आरोप करून एकाच दगडात एनडीए आणि युपीए अशा दोन्ही सरकारांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल हे आता हिट अँड रन या धोरणाने एकेकावर आरोप करून, गदारोळ माजवून त्या प्रकरणातून पळू जायला लागले आहेत. अशा पलायनामध्ये काही मुत्सद्दीपणा असता तर तो मान्यही करता आला असता. परंतु यामध्ये अपरिपक्वपणाचे दर्शन घडत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार निमुर्लनाची चळवळ बदनाम होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांनी सलमान खुर्शीद यांच्यावर आरोप केले, त्यांच्या गावात जाऊन निदर्शने केली, बरीच चळवळ केली परंतु या सगळ्या चळवळीतून त्यांनी ज्या सलमान खुर्शीद यांना भ्रष्टाचारी ठरवले त्यांनाच पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी चक्क परराष्ट्र मंत्री केले.

भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर अरविंद केजरीवाल हे चौकशीची मागणी करतात. तत्वतः त्यांचे हे म्हणणे बरोबर आहे. परंतु चौकशीची अपेक्षा सरकारकडून केलेली असते आणि सरकारच अशा भ्रष्ट लोकांना पाठिशी घालते. मग सरकारने चौकशी केली नाही म्हणून अरविंद केजरीवाल ते प्रकरण सोडून देतात. मग दुसर्याा प्रकरणाच्या मागे लागतात आणि दर दोन तीन दिवसाला एक प्रकरण उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची जबाबदारी सरकारवर टाकून अरविंद केजरीवाल नव्या प्रकरणाच्या शोधात निघतात. पहिल्या प्रकरणाचे काय झाले. याची ते चौकशीसुध्दा करत नाहीत. ते आपले काम नाही. ते सरकारचे काम आहे. असे त्यांचे म्हणणे असते.

परंतु त्यांच्या या पध्दतीने पुढचे पाठ मागचे सपाट असा प्रकार घडतो. त्यांना अनेक वेळा काही लोकांनी आव्हान दिले आहे. ते ज्याच्यावर आरोप करतात ती व्यक्ती खरोखर भ्रष्ट असेल आणि तिच्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांच्या हातात असतील तर त्यांनी कोर्टात जाऊन शहानिशा का करू नये असा काही लोकांचा सवाल असतो. तत्वतः विचार केला तर कोर्टात जाणे हे केजरीवाल यांचे काम नाही. ते काम सरकारचे आहे. पण सरकार कोर्टात जात नसेल तर एखाद्या तरी प्रकरणामध्ये केजरीवाल यांनी स्वतः कोर्टात जायला पाहिजे. परंतु ही लोकशाही आहे कोर्टशाही नाही. असे म्हणून ते कोर्टात जाण्याचे टाळत असतात. त्यांची ही टाळाटाळ पुरेशी समर्थनीय वाटत नाही.

डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी २ जी प्रकरणामध्ये असाच मार्ग सुरूवातीला अवलंबिला होता. त्यांनी वृत्तपत्रातून आवाज उठविला, पंतप्रधानांना पत्र लिहिले परंतु त्याचा काही उपयोग होत नाही असे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि शेवटी तिथे त्यांना यश आले. केजरीवाल यांनी भाराभर लोकांवर आरोप करीत बसण्यापेक्षा एका तरी प्रकरणात न्यायालयात जाऊन दाखविले पाहिजे. त्यांच्यासोबत काम करणारे अॅड. प्रशांत भूषण यांनीसुध्दा मुख्य दक्षता आयुक्तांच्या नेमणुकीच्या बाबतीत न्यायालयाचाच पर्याय वापरला आणि तिथेच त्यांना यश मिळाले. अरविंद केजरीवाल न्यायालयात जाणे हे माझे काम नाही. असे म्हणत असले तरी सामान्य माणसाला भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी घटनेनेही न्यायालयाचा  पर्याय उपलब्ध करून दिलेला असून त्याला जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे.  हे त्यांना  विसरता येणार नाही.

पण केजरीवाल न्यायालयात जात नाहीत.  या मागे अलीकडच्या काळात एक कारण दिसायला लागले आहे. केजरीवाल एखाद्या व्यक्तीला उघडे पाडण्यासाठी पुरावे म्हणून ज्या गोष्टींचा वापर करतात किवा ज्या कागदांचा आधार देतात ते पुरावे आणि ती कागदपत्रे न्यायालयात पुरावा म्हणून टिकू शकत नाहीत. आणि हे माहीत असल्यामुळेच केजरीवाल न्यायालयात जाण्यास टाळाटाळ करत असतात. त्यांनी नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या आरोपाच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात आली होतीच. परंतु आता ते रिलायन्सच्या संदर्भात आरोप करताना पुरावा म्हणून ज्या गोष्टी सांगत आहेत, त्यासुध्दा पुरावा म्हणण्याच्या लायकीच्या नाहीत असे दिसायला लागले आहे.

रिलायन्सने पूर्वी गॅसच्या दराच्या बाबतीत सरकारशी करार करताना २.३४ डॉलर्स प्रती दशलक्ष घनमीटर असा दर ठरवला होता आणि तो १७ वर्षांसाठी केलेला होता. मात्र १७ वर्षे होण्याच्या आतच रिलायन्सने दर वाढवून मागितला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने तो वाढवून दिला. १७ वर्षांचा करार असताना तो मध्येच मोडून दर वाढवून दिला त्यामुळे देशाचे नुकसान झाले. हे वरकरणी दिसत आहे आणि त्याच्याच आधारावर केजरीवाल भ्रष्टाचाराचे आरोप करीत सुटले आहेत. त्यांनी स्वतः तो करार वाचलेला नाही. १७ वर्षांची मुदत संपण्याच्या आधीच करार बाजूला ठेवून दर वाढविण्यामागे तांत्रिक कारणे कोणती घडली याचा तर ते पुसटसासुध्दा उल्लेख करीत नाहीत.

प्रणव मुखर्जी यांच्यासारखे जुने जाणते मंत्री हा दर वाढवून देतात तेव्हा त्यना मध्येच करार मोडता येत नाही हे कळत नसते असे समजणे वेडेपणाचे आहे. तेव्हा हा दर वाढवून देताना मंत्रिमंडळाच्या समितीने त्याची कारणमीमांसा कशी केली आहे हे तर केजरीवाल यांनी पहायला हवे होते. ते आरोप करतात तसे हे प्रकरण नाही. त्यांनी थातूर मातूर आरोप करण्यापासून दूर राहिले पाहिजे.

Leave a Comment