छेडाछेडीचा विषय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद येथे झालेल्या युवती मेळाव्यामध्ये खा. सुप्रिया सुळे यांनी ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातल्याही मुलींना भेडसावणार्याव काही समस्यांना वाचा फोडली. हा मेळावा घेण्याआधी त्यांनी राज्यभर दौरा केलेला आहे आणि राज्याच्या विविध भागात ५० पेक्षाही अधिक मेळावे घेतले आहेत. या सगळ्या मेळाव्यामधून सुप्रिया सुळे यांना एक तीव्र जाणीव झाली की शाळा, महाविद्यालयांत जाणार्यास मुलींची छेडाछेडी हा त्या मुलींसाठी अतिशय निकडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्यामुळेच या मेळाव्यात बोलणार्या, सर्व मुलींनी मुलींची छेडछेडी हा विषय व्यासपीठावरून छेडला.

खा. सुप्रिया सुळे यांनी सुध्दा या विषयावर चर्चा केली. ग्रामीण भागामध्ये या बाबतीत अतिशय वाईट वातावरण आहे. लग्नाचे वय किमान १८ वर्षे असले पाहिजे. असा कायदा केलेला असला आणि तो कितीही कसोशीने राबवत असल्याचा दावा सरकार करत असले तरी महाराष्ट्रात ५० टक्क्यांपेक्षाही अधिक मुलींचे विवाह १८ वर्षाच्या आत पण १८ वर्षे पूर्ण केल्याचे खोटे दाखले सादर करून केले जातात.

मुलगी वयात आल्यापासून तिच्या आईवडिलांना प्रचंड दबावाखाली जगावे लागते. लोकांच्या शेतांमध्ये कामाला जाणार्याख आईवडिलांना या वयात मुलीचे काय करावे असा प्रश्न सतत सतावत असतो. तिला घरी ठेवावे तर गावगुंडांची भीती असते आणि तिच्या इभ्रतीचा प्रश्न असतो. गावामध्ये बलात्काराचे अनेक प्रकार घडतात. परंतु एखादा मुलगा एखाद्या मुलीशी नुसता बोलला तरी सुध्दा लोक वाट्टेल ते आरोप करायला लागतात. एखाद्या मुलीवर अशा खोट्या प्रेम प्रकरणाचा खोटा आरोप झाला तरीसुध्दा त्या मुलीचे लग्न होणे अवघड होऊन बसते. म्हणून तिला घरात ठेवण्यापेक्षा शाळेत घालावे असा विचार आईवडील करतात.

सातवीपासूनचे पुढचे वर्ग प्रत्येक गावांत असतीलच असे नाही. तेव्हा बसने जाणे येणे करून त्या वर्गात शिकावे लागते. दोन चार मैत्रिणी मिळून बसने जातात खर्यात परंतु जाण्या येण्याच्या वाटेवर, प्रत्यक्ष बसमध्ये किवा बस स्टॉपवर या मुलींची छेड काढली जाते. कोणाकडे तक्रार करावी तर ती तक्रार नोंदली जात नाही. गरीब आईवडिलांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी होऊन बसते. शेवटी हे आईवडील मुलगी वयात आल्यानंतर दोन तीन वर्षे कसे तरी सांभाळतात आणि एखादा उपवर मुलगा दिसला की मुलीचे लग्न करून टाकतात. महाराष्ट्रातल्या हजारो खेड्यांमधली ही सत्य कहाणी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना आपण राज्यातल्या मुलींसाठी बारावी पर्यंतचे शिक्षण कसे मोफत केले आहे असे सांगितले हे खरे परंतु असे मोफत शिक्षण मिळविण्यासाठी तिला शाळेत जावे लागेल आणि त्यासाठी तिला सडक सख्या हरीपासून मुक्तता मिळवून द्यावे लागेल. युवती मेळाव्यामध्ये यावर बरीच चर्चा झाली. परंतु ही चर्चा हास्यास्पद वाटते. कारण मुलींची ही छेडाछेडी थांबविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसलाच करावे लागणार आहे. कारण राष्ट्रवादीचे कर्तबगार, निष्कलंक गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याच पोलिसफाटा आहे. त्यांच्या खात्याचे पोलिस छेडाछेडीला वैतागलेल्या मुलींच्या तक्रारीच लिहून घेत नसतील तर ही छेडाछेडी थांबायची कशी?

तेव्हा युवती काँग्रेसच्या मेळाव्यात छेडाछेडी थांबविण्याची मागणी करण्यात आली पण ती कोणाकडे करण्यात आली हे कळलेच नाही. ज्यांनी छेडाछेडी थांबवायची त्यांनीच मागणी करणे हे किती हास्यास्पद आहे. शरद पवार यांनी या मेळाव्यात बोलताना मुलींना सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा होण्याचे आवाहन केले पण या मुलींच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांनी आर. आर. पाटील यांच्यासमोर दुर्गावतार धारण करावा आणि महाराष्ट्रातली छेडाछेडी थांबविली नाही तर त्यांचे गृहमंत्रीपद काढून घेतले जाईल असा इशारा द्यावा. आत्ताच ही छेडाछेडी थांबली नाही तर त्याची सगळी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवरच आहे आणि ती थांबली नाही तर युवती काँग्रेसच्या मेळाव्यात छेडाछेडीचा विषय छेडण्याचे केवळ नाटक केले गेले असे म्हणावे लागेल.

सध्या सगळ्याच क्षेत्रामध्ये हेल्पलाईन निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा छेडाछेडीतून मुक्तता मिळविण्यासाठी छेडाछेडीग्रस्त मुलींकरीता एखादी हेल्पलाईन सुरू करावी आणि तिच्यावरून एखाद्या मुलीने एसएमएस केल्यास काही मिनिटांत तेथे पोलिस पोहोचतील अशी व्यवस्था केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या छेडाछेडीला खूप पैलू आहेत. एखाद्या गावातील मागासवर्गीय मुली शिक्षणात आघाडीवर चालल्या तर सवर्ण समाजातले तरुण त्यांची अधिक छेडाछेडी करतात. गरिबीमुळे त्या मुलींचे पालक हतबल असतात. त्यामुळे या छेडाछेडीबद्दल या गुंडांना कोणी जाब विचारू शकत नाही.

अशा प्रकारची छेडाछेडी थांबवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरूवातीलाच स्वतःवर एक बंधन घालून घ्यावे लागेल. छेडाछेडी करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सहभागी असणार नाही याकडे कटाक्षाने पहावे लागेल. असा एखादा कार्यकर्ता आढळला तर त्याची तक्रार थेट सुप्रियाताईंपर्यंत जावी आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याला ताबडतोब पक्षातून काढून टाकावे. असे होईल का?