अण्णांना नवीन टीममध्ये आमीरखान हवा

पुणे दि.२७ – भ्रष्टाचार विरोधातील आंदोलन पुढे नेण्यासाठी जुन्या अण्णा टीमच्या ऐवजी नव्या अण्णा टीमची जुळवाजुळव सुरू आहे. या चळवळीचे प्रणेते ,ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची नव्या टीममध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीरखान याचा टीम सदस्य म्हणून समावेश करावा अशी इच्छा असल्याचे समजते. आमीरखान सध्या त्याच्या आईला घेऊन हज यात्रेला गेला आहे. तो पुढील आठवड्यात यात्रेहून परतल्यानंतर टीम अण्णांत सहभागी होण्याविषयी त्याच्याशी चर्चा केली जाणार आहे असे अण्णांच्या निकटवर्तीयांकडून समजते.

जुनी टीम अण्णा विसर्जित केली गेली असली तरी नव्या टीम अण्णांमध्येही किरण बेदी, जलतज्ञ राजेंद्र सिह, अखिल गोगोई असे जुने चेहरे पुन्हा एकदा दिसणार आहेत. अण्णांनी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि पर्यावरणतज्ञ विश्वंभर चौधरी यांच्याशीही बोलणी केली आहेत. माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.के सिग यांचाही नव्या टीममध्ये समावेश असावा अशी अण्णांची इच्छा असून त्यांच्याशी या संदर्भात बोलणी झाली आहेत. मात्र अजून व्ही.के.सिग यांनी त्यांची संमती कळविलेली नाही.

दूरदर्शनवरून आमीरखानने सादर केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे अण्णा प्रभावित झाले आहेत. विविध सामाजिक विषयांवर या मालिकेतून प्रचंड प्रमाणावर जनजागृती केली गेली. त्यामुळे आमीरखान याचाही समावेश नव्या टीममध्ये करावा असे अण्णांना वाटते आहे. शिवाय दिल्लीत छेडल्या गेलेल्या आंदोलनात आमीरखानने व्यासपीठावर उपस्थिती लावून अण्णांच्या कार्याला पाठिंबा दर्शविला होता व त्यामुळे तो टीममध्ये सहभागी होण्यास संमती देईल अशीही अण्णांना खात्री वाटते आहे असेही सांगण्यात आले.

 

Leave a Comment