नवी दिल्ली,२६ ऑक्टोबर-फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंत भारतीयांच्या नामावलीत मुकेश अंबानी (२१ अब्ज डॉलर) यांनी सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले असून, पोलाद क्षेत्रातील अग्रगण्य लक्ष्मी मित्तल दुसर्या तर विप्रोचे अझिम प्रेमजी तिसर्या स्थानावर आहेत. असे असले तरी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सलग तिसर्या वर्षी घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदा मुकेश यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर असून गेल्या वर्षीच्या (२२.६ अब्ज) तुलनेत सुमारे १.६ अब्जची घट झाली आहे. त्या मागच्या वर्षी (२६ अब्ज) ४.४ अब्ज डॉलरची घट झाली होती.
सन फॉर्मा ग्रुपचे दिलीप शांघवी प्रथमच पहिल्या पाचमध्ये पोहचले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अब्जाधीशांची संख्या ४ ने वाढली असून, ही संख्या ५७ वरुन ६१ वर पोहचली आहे. गेल्या वर्षभरात देशातील अव्वल १०० श्रीमंतांच्या एकूण मालमत्तेत जवळपास ३.७ (९ अब्ज डॉलरची वाढ) टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे फोर्ब्स या जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या मासिकाने म्हटले आहे.
महिलांनी जगभर विविध क्षेत्रात यशाची क्षीतिजे पादाक्रांत केली आहेत. याला भारतही अपवाद नाही. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत सावित्री जिंदल सर्वांत श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. भारतीय श्रीमंतांमध्ये त्या सातव्या स्थानावर असल्या तरी एक महिला भारतीयांच्या नामावलीत पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये सलग दुसर्यांदा दाखल झाल्या, हे उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षी त्या पाचव्या स्थानावर होत्या.
अनिल अंबानी यंदाही ’आऊट’ – फोर्ब्सच्या भारतीय दहा श्रीमंतांच्या यादीत अनिल अंबानी यांना सलग दुसर्या वर्षी स्थान पटकावता आले नाही. ते आकराव्या क्रमाकांवर राहिले. रिलायन्स कम्युनिकेशन्सची सध्या खडतर वाटचाल सुरू असून या कंपनीवर सुमारे ५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. कर्जाचा भार कमी करणे आणि निधी उभारणीचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. त्याचप्रमाणे अंबानी यांच्या रिलायन्स समुहातील कंपन्यांची यंदाच्या वर्षातील कामगिरीही विशेष झालेली नाही. अनिल अंबानी यांची संपत्ती ६ अब्ज डॉलरच्या आसपास आहे.
२०१२ चे टॉप टेन श्रीमंत!
मुकेश अंबानी – (२१ अब्ज डॉलर)
लक्ष्मी मित्तल – (१६ अब्ज डॉलर)
अझिम प्रेमजी – (१२.२ अब्ज डॉलर)
पालोनजी मिस्त्री – (९.८ अब्ज डॉलर)
दिलीप शांघवी – (९.२ अब्ज डॉलर)
अदी गोदरेज – (९ अब्ज डॉलर)
सावित्री जिंदाल – (८.२ अब्ज डॉलर)
शशी आणि रवी रुईया – (८.१ अब्ज डॉलर)
हिंदुजा ब्रदर्स – (८ अब्ज डॉलर)
कुमार मंगलम बिर्ला – (७.८ अब्ज डॉलर)
२०११ चे टॉप टेन श्रीमंत!
मुकेश अंबानी- (२२.६ अब्ज डॉलर)
लक्ष्मी मित्तल- १९.२ अब्ज डॉलर)
अझिम प्रेमजी – १३ अब्ज डॉलर)
शशी आणि रवी रुईया- (१०.२ अब्ज डॉलर)
सावित्री जिंदल- (९.५ अब्ज डॉलर)
सुनील मित्तल- (८.८ अब्ज डॉलर)
गौतम अदानी- (८.२ अब्ज डॉलर)
कुमार मंगलम बिर्ला- (७.७ अब्ज डॉलर)
पालोनजी मिस्त्री- (७.६ अब्ज डॉलर)
अदी गोदरेज (६.८ अब्ज डॉलर)