केजरीवालांपुढे आता राखी सावंतचे ’संकट’!

नवी दिल्ली,२६ ऑक्टोबर-इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांच्या पुढे आता आयटम गर्ल राखी सावंतच्या रूपाने संकट उभे राहिले आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, अॅनी कोहली यांच्यानंतर आता राखीने केजरीवालांना काही प्रश्न विचारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

दसर्‍यानिमित्त राखी सावंत सध्या दिल्लीत आली आहे. रावण दहनाचा कार्यक्रम पाहिल्यानंतर परतण्याआधी तिने अलीकडे दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन छेडणारे अरविंद केजरीवाल यांची तोंडी परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. केजरीवाल यांच्या बदलत्या भूमिकांबाबत राखीला काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत. त्यासाठी केजरीवालांशी आपली भेट ठरली असल्याचेही तिने सांगितले आहे. मात्र ते प्रत्यक्ष न भेटल्यास टीव्ही व वृत्तपत्रांच्या माध्यमातून राखी केजरीवालांवर प्रश्नांच्या फैरी झाडणार आहे.

राखी सावंत केजरीवालांवर नाराज असून तिने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ती म्हणते, ’केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्यासोबत केलेली आंदोलने चांगली होती. मात्र आता ते रस्ता चुकले आहेत. लोकांना भडकावत आहेत. फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडे कोणाच्याविरोधात पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे,’ असेही तिने म्हटले आहे.
केजरीवाल माझे सर्वात मोठे फॅन

केजरीवाल हे माझे सर्वात मोठे फॅन आहेत आणि मला टीव्हीवर बोलताना पाहूनच ते बोलायला शिकले आहेत, असा दावा करीत ’केजरीवाल नेते आहेत, समाजसेवक आहेत की हिटलर असा सवालही राखीने केला आहे. केजरीवालांनी हिटलरी वृत्ती सोडून द्यायला हवी आणि लोकांना टोपी घालणेही बंद करावे, असेही तिने म्हटले आहे.
दरम्यान, केजरीवाल व राखी सावंत यांच्या भेटीबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे टीम केजरीवालने म्हटले आहे.

Leave a Comment