मलाला सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराची मानकरी

इस्लामाबाद दि.१७- तालिबान्यांनी डोक्यात गोळ्या घातल्याने गंभीर जखमी अवस्थेत ब्रिटनमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या १४ वर्षीय मलाला युसुफझाई हिला पाकिस्तानी सरकारने देशातील सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार ‘ सितारा ए शुजात‘ जाहीर केला आहे. तालिबानी दहशतवादी संघटनेचा मुकाबला करण्याचे शौर्य दाखविल्याबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी मंगळवारी जाहीर केले. ते मलालाच्या शाळेला भेट देण्यासाठी गेले असताना ही घोषणा त्यांनी केली. ही शाळा मलालाचे वडीलच चालवितात.

मलालावर हल्ला झाला तेव्हा तिच्यासोबत असलेल्या शाझिया रमझान आणि कायनात अहमद या दोघी मुलीही हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. त्या दोघींनाही रोख रककमचे बक्षीस देऊन त्यांचे कौतुक रहमान यांनी केले. यावेळी मलालावर हल्ला करणार्‍यांचा शोध गुप्तचर यंत्रणा घेत असून कांही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे व त्यातील एकाची ओळख पटली असल्याचेही रहमान यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये बर्मिंगहॅम येथील क्वीन एलिझाबेथ रूग्णालयात उपचार घेत असलेल्या मलालाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.