चॉईस नंबरमुळे ५ कोटींचा आरटीओला महसूल

पुणे दि.१७ – आपल्या वाहनांसाठी चॉईस किवा आवडीचा नंबर घेण्याच्या वाढत चाललेली क्रेझ प्रादेशिक परिवहन कार्यालयाला चांगलीच लाभदायक ठरली असून गेल्या सहा महिन्यांत असे नंबर देऊन या विभागाने तब्बल ५ कोटींचा महसूल मिळविला आहे. इतकेच नव्हे तर या आर्थिक वर्षाअखेर हा महसूल १० कोटींची पातळी गाठेल असेही सांगण्यात येत आहे.

असे चॉईस नंबर घेणार्‍यात राजकारणी आणि पक्ष कार्यकर्ते आघाडीवर आहेत. त्यामागचे अंकशास्त्र काय असेल ते असो पण ठराविक पक्षाचे कार्यकर्ते ठराविकच नंबरला पसंती देताना दिसतात. मोटर वाहन नियमानुसार असा आवडीचा नंबर मिळवायचा असेल तर दुचाकीसाठी त्याचे दर २ हजारांपासून २५ हजारापर्यंत आहेत तर चारचाकी साठी एखादा रेअर नंबर मिळवायचा तर तीन लाखांपर्यंत रक्कम मोजावी लागते. पुणे आरटीओने गेल्या सहा महिन्यात असे ७२८६ चॉईस नंबर दिले आहेत. आरटीओकडील आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षात यातून मिळणारा महसूल दरवर्षी ३० ते ४० टक्कयांनी वाढलेला दिसून येत आहे.

आरटीओ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला दोनचाकी वाहनांसाठी चॉईस नंबरची सिरीज जारी केली जाते तर चारचाकीची सिरीज दर अडीच महिन्यांनी जारी केली जाते. असे नंबर घेणार्‍यात राजकारणी, कार्पोरेट क्लास मोठा आहे. १, ७, ९९९, १२१२, २७२७ हे रेअर नंबर आहेत आणि हे नंबर घेणार्‍यांना तीन लाख रूपये रक्कम अधिक मोजावी लागते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे सचिव रणजित परदेशी यांनी सांगितले की ग्रामीण भागात असे नंबर मागणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. आमचे बहुतेक कार्यकर्ते, नेते १०१० या नंबरला पसंती देतात कारण आमच्या पक्षाची खूण घड्याळ आहे आणि त्यातील काटे १० वाजून १० मिनिटे झाल्याचे दाखवितात. मनसेचे समर्थक ९ नंबरला अधिक पसंती देतात कारण त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीचा नंबर ९ आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही असेही ते सांगतात.

 

Leave a Comment