केजरीवालांनी खुर्शीद यांना विचारले पाच प्रश्न

नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर-सामाजिक कार्यकर्ता अरविंद केजरीवाल आणि सलमान खुर्शीद यांच्यातील शाब्दिक चकमकींमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. केजरीवाल यांनी केंद्रीय कायदा मंत्री सलमाम खुर्शीद यांना पाच प्रश्न विचारले आहेत.
खुर्शीद यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास पदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट केले आहे. खुर्शीद आज दुपारी प्रेस कॉन्फरन्समध्ये केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देणार आहेत.
केजरीवाल यांनी खुर्शीद यांना विचारलेले पाच प्रश्न –
१ खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अपंगांचा निधी लाटण्याचा प्रयत्न केला आहे का?
२ माजी अधिकारी जे बी सिंह यांच्या बनावट शपथ पत्राचा वापर करण्यात आला आहे का?
३ यूपी सरकारने दिलेल्या रिपोर्टच्या मते कॅम्प लागला नव्हता. देण्यात आलेला हा रिपोर्ट खोटा आहे?
४ १२ जुनरोजी अखिलेश सरकारने दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे का?
५ सर्व आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देणार का?
तपुर्वी, केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांचे रविवारी दिल्लीत आगमन झाले. लंडनहून भारतात परतलेल्या खुर्शीद यांचे स्वागत केजरीवाल आणि सहकार्‍यांनी काळे झेंडे आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजीने केले.खुर्शीद आणि त्यांची पत्नी लुई अपंगांसाठी चालवित असलेल्या संस्थेतील कामकाजात अनियमितता असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
लंडन येथे असतांना खुर्शीद यांनी केजरीवालांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले होते. पब्लिसिटी मिळवण्यासाठी काही लोक त्यांच्यावर आरोप करत आहेत असे खुर्शीद यांनी सांगितले. दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी सलमान खुर्शीद आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.