नवी दिल्ली: विदेशातून रविवारी राजधानीत परतलेले कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्या विरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावरंच जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली: विदेशातून रविवारी राजधानीत परतलेले कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्या विरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावरंच जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली.
अपंगांना सायकल रिक्षा देण्यासाठी खुर्शीद आणि त्यांच्या पत्नीच्या स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी खुर्शीद यांना मंत्रीपदावरून हटवावे या मागणीसाठी केजरीवाल, मनीष सिसोदिया, गोपाल राय यांच्यासह अपंग समाजसेवी संस्थेच्या सदस्य कार्यकर्त्यांनी खुर्शीद यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे.
विमानतळावर खुर्शीद यांच्या निषेधाचे फलक आणि काळे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्शीद यांच्या विरोधात घोषणा दिल्या. सुरक्षा कर्मचारी अति विशिष्ट व्यक्तींसाठीच्या मार्गावरून खुर्शीद यांना घेऊन जात असता काही कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला.
दरम्यान; खुर्शीद यांनी राजधानीत पोहोचताच पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला आहे; तर इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांनी जंतर मंतर येथे आपल्याबरोबर खुला वाद-विवाद करावा; असे आव्हान दिले आहे.