साखर नियंत्रणमुक्तीचा निर्णय लवकरच: पवार

सांगली: साखरेवरील नियंत्रणे उठविण्याच्या सी. रंगराजन समितीच्या शिफारसी स्वीकारण्याबाबत सरकारची अनुकूल भूमिका असून लवकरच त्याचा निर्णय घेतला जाईल; असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकार सर्वच क्षेत्रातील निर्बंध उठविणार असून साखर उद्योगालाच बंधने कशाला; असा सवालही त्यांनी केला.

गरिबांना शिधापत्रिकेवर स्वस्त दरात साखर मिळणे गरजेचे आहे. मात्र अशाप्रकारे वितरीत करण्यात येणारी साखर सरकारी तिजोरीतून बाजारभावाने खरेदी केली जावी. कारखान्यांकडून नियंत्रित दराने सरकार लेव्ही साखर खरेदी करीत असल्याने त्याचा परिणाम शेवटी शेतकऱ्यांच्या ऊसाला कमी भाव मिळण्यातच होतो. त्यामुळे साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय आवश्यक असून तो लवकरच घेतला जाईल; असेही पवार म्हणाले.

रंगराजन समितीचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर येईल. मीच मंत्रिगटाचा अध्यक्ष असल्याने साखर उद्योगाच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत योग्य पाठपुरावा केला जाईल; असेही ते म्हणाले.