येडियुरप्पांचा डिसेंबरमध्ये भाजपशी काडीमोड

बंगलोर दि.११- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बलशाली नेते येडीयुरप्पा यांनी अखेर भाजपशी काडीमोड घेणार असल्याचे जाहीर केले असून डिसेंबरमध्ये ते भाजपला रामराम करणार आहेत. बंगलोरपासून जवळच असलेल्या अनेकल येथील एका समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

येडियुरप्पा म्हणाले की माझे विचार अतिशय स्वच्छ आहेत. भाजप वरीष्ठ कार्यकारणीने त्यांना राज्य प्रदेशाध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता मात्र तो पाळला गेला नाही. भाजपचे वरीष्ठ नेते माझ्या म्हणण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरमध्ये मी भाजपमधून बाहेर पडणार आहे. त्यानंतर नवीन पक्ष काढायचा का अन्य पक्षात जायचे याचा निर्णय ते त्यांच्या विश्वासातील लोकांशी चर्चा केल्यानंतर घेणार आहेत. प्रादेशिक पक्ष काढण्यासाठी कशी परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी ते कर्नाटकचा दौरा करत आहेत. 

अर्थात भाजपला सोडचिठ्ठी दिली तरी सध्या कर्नाटकात सत्तेवर असलेले भाजपचे जगदीश शेट्टर यांचे सरकार पाडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.