दोन दिवसांपूर्वी बडोद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. आणि या बैठकीत श्री. शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा बिनविरोध फेरनिवड झाली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही संघटनात्मक बांधणीच्या संदर्भातली सर्वात महत्त्वाची घटना असते. अन् तिच्यातच पक्षाची संघटना, तिची रचना, त्यासाठीच्या नियुक्त्या इत्यादींची चर्चा होऊन कामाचे वाटप केले जात असते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि तो देताना आपण आता संघटनात्मक कामाला वाहून घेणार आहोत असे जाहीर केलेले आहे. त्यांच्यावर आता प्रशासकीय कामाचा भार नाही. त्यामुळे ते मनसोक्तपणे संघटना बांधण्याचे काम करू शकतात. आपल्याला लाल दिव्याच्या गाडीची हाव नाही आणि अशी गाडी काही जन्माला पुरत नसते असे म्हणत त्यांनी आपण संघटना बांधणीच्या कामाला किती समर्पण बुध्दीने वाहून घेणार आहोत हे स्पष्ट केलेले आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये संघटनेच्या बांधणीला वाहून घेणार्या कार्यकर्त्यांची फार वानवा जाणवत आहे. सगळ्यांना सत्तेची खुर्ची हवी आहे. त्यामुळे अजित पवार यांचा संघटना बांधणीच्या कामाला वाहून घेण्याचा हा निर्धार अपवादात्मक आणि कौतुकास्पद आहे.
दादांचा राजकीय आजार
अशा प्रकारे संघटन बांधणीस कटिबध्द झालेले अजित पवार संघटन बांधतात म्हणजे नेमके काय करतात या विषयी खूप उत्सुकता लागून राहिली होती. परंतु गेल्या १५ दिवसांत तरी त्यांनी निरनिराळ्या कार्यक्रमात उपस्थित राहून भाषण करण्यापलीकडे काही केल्याचे निदान आम्हांला तरी ठावूक नाही. त्यांनी काही केलेच नाही असे काही म्हणता येणार नाही कदाचित त्यांनी १५ दिवस आपल्या मनाशी राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना व्यापक करण्याची एखादी परफेक्ट योजना तयार केली असेल. किंबहुना तशी केली असणारच म्हणूनच ते बडोद्याला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हजर राहतील आणि आपली ही संघटना बांधणीची योजना पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसमोर ठेवतील अशी अपेक्षा होती. कारण अजितदादांनी स्वतःला ज्या कामाला वाहून घेतले आहे त्या कामाची सर्वात महत्त्वाची ती बैठक होती पण अहो आश्चर्यम् ! अजितदादा या बैठकीला साधे हजर सुध्दा राहिले नाहीत. मग संघटना बांधणीची योजना सादर करणे तर दूरच.
गेल्या १५ दिवसांमध्ये जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की, जिथे शरद पवार असतात तिथे अजित पवार जात नाहीत. अजित पवार हे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन संघटनात्मक कामाला वाहून घेतल्याचे सांगत आहेत. परंतु ते आता संघटनात्मक काम करतील अशी कसलीही घोषणा शरद पवार यांनी केलेली नाही. घोषणा तर दूरच पण त्यांनी तसे आडून आडून सूचितसुध्दा केलेले नाही. तसे असते तर अजित पवार बडोद्याला हजर राहिले असते आणि शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी पक्षामध्ये संघटन सचिव असे एखादे खास पद निर्माण करून तशी घोषणा बडोद्याच्या या बैठकीतच केली असती. पण तसे काही घडलेले नाही. त्यातून पक्षात दिसून येणारा विसंवाद फार ठळक होऊन तो चर्चेचा विषय बनू नये यासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही अजित पवार आजारी असल्यामुळे बडोद्याच्या बैठकीला आले नाहीत असे खुलासे केले.
त्यांच्या या गैरहजरीने पक्षात पवार विरूध्द पवार असा संघर्ष सुरू आहे या चर्चेला गती आली आहे. ती दोघांसाठीही सोयीची नाही. त्यामुळे अजित पवार आजारी असले तरी त्यांनी तापल्या अंगाने या बैठकीला हजर राहणे आवश्यक होते. अजितदादांचा ताप त्यांना पाच मिनिटेसुध्दा बैठकीत हजर राहणे मुश्किल व्हावे एवढा गंभीर नक्कीच नव्हता. कारण बडोद्याच्या बैठकीच्या दुसर्याच दिवशी ते मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.
या मुंबईच्या कार्यक्रमातला त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर ते आदल्या दिवशी बडोद्याच्या बैठकीला तोंड दाखविता येणार नाही एवढे आजारी होते असे नक्कीच वाटत नाही. अर्थात् याचे फार विश्लेषण करण्याची गरज नाही. शरद पवार अणि अजित पवार समोरासमोर येऊ शकत नाहीत. अजित पवार यांच्यात काकांना तोंड दाखविण्याची हिम्मत नाही कारण त्यांचा राजीनामा काकांना पसंत पडलेला नाही. अजित पवार यांची जी काही उरली सुरली ताकद आहे तिचा वापर करून, काहीसे उसने अवसान आणून बैठका घेत चाललेले आहेत आणि पक्षातले आपले स्थान संपलेले नाही हे दाखविण्याची धडपड करत आहेत. परंतु काही दिवसांनी पक्षाच्या फलकांवर आणि पोस्टर्सवर सुप्रिया सुळे यांची छबी झळकायला लागेल आणि अजित पवारांचे स्थान संपलेले आहे हे यथाकाळ स्पष्ट होईल.
खरे म्हणजे हे फार अनपेक्षित नाही. कारण शरद पवार यांच्या पक्षात किवा गटात एखादा नेता अगदी नंबर दोनच्या पदापर्यंत वर जातो नंतर तो संपतो असा इतिहास आहे. त्या मालिकेत आपला समावेश होऊ शकेल असे अजित पवारांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यासाठी मात्र हे अनपेक्षित आहे.
