भ्रष्टाचार दडपण्यासाठी सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात सेटिंग : सोमय्या

मुंबई,१० ऑक्टोबर-रॉबर्ट वढेरा यांच्यासारखाच महाराष्ट्रतही जमीन घोटाळा झाला असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना नवी मुंबईत १०० एकर जागा ब्ल्यू सर्कल इन्फोटेक या खासगी कंपनीकडून देण्यात आली असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच राज्यातील विविध मंत्र्यांचे भ्रष्टाचार दडपण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात समझोता (सेटिंग) झाला असल्याचा नवा व गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील काँग्रेस व राष्ट*वादी काँग्रेसचे मंत्री मिळून भ्रष्टाचार करीत आहेत. तसेच त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे नेतेच प्रयत्न करीत आहेत. राज्यातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात सेटिंग झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुनील तटकरे यांच्या विरोधात चौकशीला परवानगी देत नाहीत. तटकरेंच्या चौकशीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाणून- बुझून गृहमंत्रालयाकडे अद्याप प्रलंबित ठेवला आहे. तसेच त्यांची चौकशी एसीबीमार्फत होत असली तरी, तटकरे यांची चौकशी म्हणजे खोटे नाटक असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना नवी मुंबईत १०० एकर जमिन देण्यात आली असून त्याची कागदपत्रेच त्यांनी दाखविली. छगन भुजबळ, विजयकुमार गावित यांची चौकशी कधी करणार असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.
सिंचन घोटाळ्यातील पैसा राष्ट*वादी काँग्रेसने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत वापरला असल्याचे सांगून सोमय्या म्हणाले, कृष्णा खोरे आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कंपन्यांचा ऑडिटर हा एकच आहे. मुंबईतील चोखरा एंड गांधी या सीए फर्मने हे ऑडिट केले आहे. कृष्णा खोरे घोटाळ्याला त्या विभागाचे मंत्री रामराजे निंबाळकर हेच जबाबदार असल्याचेही सोमय्या यांनी आरोप केला.

Leave a Comment