मोदींच्या विजयाचा वारू रोखणे अशक्य- बाळासाहेब ठाकरे

मुंबई दि. ६- गुजराथेत डिसेंबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांत मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्याच पक्षाचा म्हणजे भाजपचाच विजय निश्चित असून भाजपला मोदी सलग तिसर्‍यांदा गुजराथची सत्ता मिळवून देतील असा विश्वास शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

बाळासाहेब म्हणतात, मोदींनी गुजराथचा गेल्या १० वर्षात जो विकास केला आहे तो पाहिला तर या निवडणुकांत मोदींच्या विजयाचा वारू रोखणे कुणालाच शक्य होणार नाही. मोदींनी गुजराथला भक्कम नेतृत्त्व दिले असून त्यांची गुजराथवरील पकड जबरदस्त आहे. काँग्रेसने मोदी राक्षस असल्याचे व भारतातील सर्व मुस्लीमांना गिळंकृत करणार असल्याचे चित्र कितीही उभे केले तरी ते खरे नाही हे मुस्लीमांनाही माहिती आहे. मृत्यूचा दूत अशी काँग्रेसने मोदींची संभावना मागील निवडणुकांतही केली होती पण शेवटी काय घडले? काँग्रेसला फक्त ५५ जागा मिळविता आल्या तर मोदींनी १२१ जागा मिळविल्या. 

गुजराथेतील प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी पहिल्याच फेरीत खुद्द सोनिया गांधी यांना उतरावे लागले तरी त्यांच्या भाषणात त्यांनी मोदींचा उल्लेख चुकूनही केला हे लक्षात घेतले पाहिजे. याचा अर्थ काँग्रेसला आपला पराभव मनोमन मान्यच आहे. राहता राहिला प्रश्न तो भाजपतून फूटून बाहेर पडलेल्या केशुभाईंचा. सौराष्ट्रात पटेल वरचढ आहेत. केशुभाई या भागात मोदींना आव्हान देतील व या दोन पक्षात मतांची फूट झाल्याने आपल्याला फायदा होईल असे काँग्रेसला वाटते आहे पण तेही केवळ दिवास्वप्नच आहे हे काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे.

 

Leave a Comment