केवळ १ मिनिटांत आणि दोन रूपये खर्चात मधुमेहींच्या रक्तशर्करेची पातळी सांगणारे उपकरण भारतीय संशोधकांनी तयार केले असून त्याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. बिटस पिलानी येथील संशोधकांनी ही कामगिरी यशस्वी केली आहे. यामुळे भारतातील ६ कोटी १० लाख मधुमेहींना मोठेच वरदान मिळणार आहे.
रक्तशर्करेचे १ मिनिटात निदान करणारे उपकरण
या संशोधनातील प्रमुख संशोधक सुमन कपूर म्हणाले की सध्या बाजारात असलेल्या गुक्लोमीटरपेक्षा हा ग्लुकोमीटर अधिक उपयुक्त आहे. रक्तशर्करेच्या तपासणीसाठी जितके रक्त लागते त्यापेक्षा १०००पट कमी रक्त घेऊन केवळ १ मिनिटात तपासणी अहवाल मधुमेहींना मिळू शकणार आहे शिवाय त्यासाठी फक्त दोन रूपये खर्च येईल. रक्त तपासणीचा अहवाल केवल १० सेकंदात दिला जाणार आहे. या उपकरणाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसमोरही चाचण्यांचे अहवाल सादर करण्यात आले आहेत. आता देशाच्या विविध भागातील निदान चिकित्सा प्रयोगशाळांना हे उपकरण दिले जाणार असून तेथेही चाचण्या घेतल्यानंतर ते बाजारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल.
डिसेंबरपर्यंत हे उपकरण बाजारात दाखल होईल असेही त्यांनी सांगितले. या उपकरणाच्या पेटंटसाठीही अर्ज करण्यात आला आहे.
मधुमेहींना वारंवार रक्तशर्करा तपासावी लागते. सध्याच्या ग्लुकोमीटरची स्ट्रीप दरवेळी बदलावी लागते. नव्या उपकरणात ही स्ट्रीप वारंवार बदलण्याची गरज नाही. भारतात मधुमेहींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन २१ राज्यातील १०० जिल्ह्यात ३० वर्षांवरील सर्व पुरूष आणि सर्व वयातील गरोदर महिलांची या उपकरणाच्या सहाय्याने रक्तशर्करा तपासण्याचा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
