घड्याळाचे काटे उलटे

केंद्र सरकारने धोरण लकवा सोडून दिलेला आहे असे दिसते. मुक्त अर्थ व्यवस्थेच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांनी गेली तीन वर्षे अशा धोरणांच्या बाबतीत सरकारची सातत्याने अडवणूक केली. त्यामुळे सरकारला सारखी आपली पावले मागे घ्यावी लागली आणि मुक्त अर्थव्यवस्था नको, आधी आपले सरकार सांभाळा असे धोरण बाळगले. परिणामी सरकार टिकले, पण धोरण बारगळले. आता ममताजींचा जाच संपलेला आहे आणि सरकारचे पाय ओढणारे कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आता सरकार वेगाने एकेक पाऊल टाकत आहे.

किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात ५१ टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी देणारा आदेश सरकारने काढला आहे. त्याचे काही परिणाम जाणवत आहेत. अजून ही गुंतवणूक झालेली नाही, परंतु ती होणार याची खात्री पटल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार उत्साहात आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून बाजारातील डॉलरची उपलब्धता वाढत आहे. डॉलर असा मिळायला लागला की, रुपयाची किमत सुधरायला लागते. सध्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत थोडे का होईना वाढले आहे. त्यामागचे कारण हेच आहे. सरकारच्या धोरणाविषयी आता उद्योग व्यवसायामध्ये विश्वासाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी सरकारने असे पाऊल टाकायचे ठरवले तेव्हा भारतीय जनता पार्टीसहीत सारे विरोधी पक्ष, डावे पक्ष, सं.पु. आघाडीतील घटक पक्ष, एवढेच नव्हे तर काँग्रेस मधला एक गट सुद्धा त्याच्या विरोधात गेला होता. सरकारही भलतेच संभ्रमात सापडले होते. या मुद्यावर भारतीय जनता पार्टीने संसदेचे पूर्ण अधिवेशन बंद पाडले होते. त्यामुळे सरकारने कच खाऊन तो निर्णय मागे घेतला होता. हे सगळे आठवले म्हणजे आता आश्चर्य वाटते. कारण आता सरकारने निर्धाराने पावले टाकायला सुरुवात केली. नवे अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी सूत्रे हाती घेतली आणि किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा आदेश काढला. तेव्हा मात्र कोणी चकार शब्द सुद्धा काढलेला नाही. सरकारने पूर्वी आदेश काढताना अशी निश्चयाने पावले टाकली असती तर मागेच हा आदेश लागू झाला असता. परतु सरकारचा निर्धार कमी पडत होता आणि सरकारमधला एक गटच संभ्रमात होता. 

सध्या मात्र सरकारची पावले कौतुकास्पद रित्या पडत आहेत. एफ.डी.आय.च्या निर्णयावर सारे चिडीचूप बसलेले बघून केंद्र सरकारने आता आणखी काही पावले टाकली आहेत. काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने या पावलांचे निर्णय घेतले. 

त्यातल्या एका निर्णयानुसार विम्याच्या क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्कयांपासून ४९ टक्क्यापर्यंत नेण्यात येणार आहे. अशाच प्रकारची वाढ निवृत्ती वेतनाच्या क्षेत्रातही होणार आहे. या सार्‍या निर्णयांना विरोधी पक्षांचा विरोध होणारच आहे आणि हा विरोध केवळ विरोधासाठी आहे. त्या विरोधामागे कसले अर्थशास्त्र नाही, तर्कशास्त्र नाही आणि विचारसरणीच्या दृष्टीने सुद्धा त्यामध्ये काही तथ्य नाही. 
हा सारा विरोध बघितला म्हणजे १९९१ सालची आठवण होते. त्यावेळी भारतामध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली मनमोहनसिंग यांच्या हातून मुक्त अर्थव्यवस्था राबवली गेली. त्यावेळी विरोधी पक्षात बसलेल्या सर्वच पक्षांनी या अर्थव्यवस्थेलाच मुळात विरोध केला होता. १७ व्या शतकात एक परदेशी कंपनी देशात आली, त्यातून देश परतंत्र झाला. आता अशा हजारो कंपन्या आल्या तर देश स्वतंत्र राहील का, असा प्रश्न ही मंडळी विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संघटना विचारत होत्या. परदेशातल्या कंपन्या आल्यास आपल्या देशातल्या कंपन्या बंद पडतील, अशी भीती हे लोक घालत होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. परदेशी कंपन्या आल्यामुळे भारतातल्या काही कंपन्या बंद पडण्याच्या मार्गाला लागल्या, परंतु आपण गाशा गुंडाळण्यापेक्षा परदेशी कंपन्यांशी स्पर्धा केली पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यांनी स्पर्धा करून सुधारणा घडवल्या.

अशी स्पर्धा करून बदल करण्याचे ज्यांनी नाकारले त्या कंपन्या बंदच पडल्या आणि त्या बंद पडायला हव्या होत्या. मात्र ज्या कंपन्यांनी स्पर्धेचा विचार केला त्या केवळ टिकल्याच आहेत असे नाही तर या भारतीय कंपन्यांनी परदेशातल्या अनेक कंपन्या विकत घेतल्या. म्हणजे जागतिकीकरणामुळे भारतीय कंपन्या बंद पडणे तर दूरच पण या कंपन्या मल्टीनॅशनल झाल्या. आज यूरोप खंडातला सर्वात मोठा पोलाद प्रकल्प टाटा चालवत आहेत. टाटांनी ब्रिटनमधला सर्वात मोठा कार उद्योग विकत घेतला आहे. ज्या इस्ट इंडिया कंपनीने भारतावर पारतंत्र्य लादले ती इस्ट इंडिया कंपनी अवघ्या २८ वर्षे वयाच्या एका तरुणाने विकत घेतली आहे. त्यामुळे १९९१ साली हे जागतिकीकरणाचे विरोधक जी भाषा बोलत होते ती खोटी ठरलेली आहे. तरीही केवळ सरकारला विरोध करण्यासाठी हे लोक पुन्हा तीच भाषा वापरत आहेत. यातला ढोंगीपणा लक्षात घेतला पाहिजे. 

त्यांचा हा विरोध केवळ सत्ताधारी पक्षासाठीच घातक आहे असे नाही तर तो देशासाठी घातक आहे आणि त्यांच्या विरोधामुळे देशाच्या प्रगतीपर वाटचालीत अडथळे येत आहेत. तेव्हा त्यांनी जरा डोळे उघडून सगळीकडे पाहिले पाहिजे.

 

Leave a Comment