लंकेतील तमीळांसाठी भारतातर्फे गृहप्रकल्प

नवी दिल्ली दि.३ – श्रीलंकेतील अंतर्गत यादवीत विस्थापित होण्याची पाळी आलेल्या ४३ हजार तमीळ कुटुंबासाठी भारत सरकारने श्रीलंकेतच गृहप्रकल्प योजना चालविली असून त्यासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचे मंगळवारी, गांधी जयंतीचे निमित्त साधून जाहीर करण्यात आले. श्रीलंकेच्या उत्तर भागात व जाफना जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत या अगोदर १० हजार घरे बांधली गेली असून आता दुसर्‍या टप्प्याच्या कामाची सुरवात करण्यात येत आहे. श्रीलंकेचे अर्थविकास मंत्री बसील राजपक्षे आणि भारतीय उच्चायुक्त अशोक कांथा हे दोघे या उद्घाटन समारंभाला हजर होते.

१५०० तमीळ मुस्लीमांना घरबांधणीसाठीची प्रमाणपत्रे देण्यात आली असून त्यात ते स्वतःच्या जागेत अथवा सरकारकडून दिल्या जाणार्‍या जागेत घर बांधू शकणार आहेत. पुढील ऑगस्टपर्यंत दहा हजार घरे उपलब्ध केली जाणार आहेत. विस्थापित तमीळांसाठी ५० हजार घरे बांधून देण्याचे भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग आणि श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे या दोघांत २०१० साली झालेल्या भेटीत मान्य करण्यात आले होते. प्रत्येक विस्थापित कुटुंबाला घर बांधण्यासाठी साडेपाच लाख श्रीलंकन रूपये देण्यात येणार असून ही रक्कम चार हप्त्यात देण्यात येणार आहे.

 

Leave a Comment