भारतीय आणि चिनी करणार धुमधडाका खरेदी

भारत आणि चीन या जगातील दोन मोठ्या वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठांना भविष्य काळ चांगला जाणार असे संकेत सध्या मिळत असून बोस्टन कन्सल्टींग ग्रुपने ‘ क्राफ्ट यम् ‘ या नांवाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचे हे अंदाज आहेत. २०२० पर्यंत या दोन देशातील ग्राहकांच्या क्रयशक्तीत भक्कम वाढ होणार असल्याचे आणि खरेदीचा हा आकडा ६४ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचण्याचे संकेत या सर्वेक्षणातून मिळाले आहेत. 

वास्तविक जागतिक मंदीचे परिणाम या दोन देशांवरही जाणवत असून त्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती थोडी गंभीर आहे. मात्र तरीही ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे या दोन देशातील प्रमाण आगामी दशकात लक्षणीयरित्या वाढणार आहे. म्हणजेच या दोन देशातील ग्राहक बाजारात क्रांती घडविणार आहेत. कारण या दोन देशात या काळात मध्यमवर्गीय लोकसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होणार आहे. भारतापुरते बोलायचे तर ही लोकसंख्या २०१० च्या २८ टक्के वाढीच्या तुलनेत २०२० मध्ये ४५ टक्के वाढ दाखवील. या दोन देशात पेप्सिको, बीएमडब्ल्यू, गुस्सी, एलव्हीएमएच, परनॉड रिकार्ड या जागतिक ब्रँडनी चंागलाच जम बसविला आहे आणि त्यांची उत्पादने आगामी दशकात अधिक वेगाने खपतील असाही अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे.