वॉशिंगटन: भारतीय आय.टी. कंपन्यांचे आव्हान थोपविण्यासाठी जगातील अग्रगण्य कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने रडीचा डाव सुरू केला आहे. त्यानुसार विदेशातून अमेरिकेत नोकरीसाठी येणार्यांना घ्याव्या लागणार्या व्हिसाच्या आणि ग्रीन कार्डच्या शुल्कात अवाजवी वाढ करण्याची मागणी कंपनीने अमेरिकन काँग्रेसकडे केली आहे.
भारतीय आयटी कंपन्या आणि अभियंत्यांनी जगभरात आपल्या कारकीर्दीचा दमदार ठसा उमटविला आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या कंपनीनेही त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी अमेरिकन काँग्रेससमोर शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.
या प्रस्तावात कंपनीने नोकरदारांच्या व्हिसा शुल्कात वाढ करून ते तब्बल १० हजार डॉलर्स; तर कायम स्वरूपी अमेरिकेत स्थायिक होण्यासाठीच्या ग्रीन कार्डाचे शुल्क १५ हजार डॉलर्स करण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेने दरवर्षी एच १ बी आणि ग्रीनकार्डचे २० हजार अर्ज मंजूर करावे. यातून देशाला १० वर्षात ५०० हजार कोटी डॉलर्सचा महसूल उपलब्ध होईल. या महसुलाचा वापर करून देशात अभियांत्रिकी, विज्ञान, गणित आणि तंत्र शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराव्या. त्यामुळे आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ देशातच उपलब्ध होऊ शकेल; असा दावा कंपनीने आपल्या प्रस्तावात केला आहे.