अजित पवारांची स्थिती

अजित पवार यांनी नैतिक मुद्यावरून राजीनामा दिला, त्याला आता ४८ तास उलटले आहेत आणि हळू हळू राजीनाम्याची काही कारणे स्पष्ट होत आहेत. त्याच बरोबर या राजीनाम्याचे परिणाम काय होणार याचाही काहीसा अंदाज येत आहे. अजितदादा पवार यांनी आपल्या विरुद्ध सुरू असलेल्या बदनामीच्या मोहिमेमुळे राजीनामा दिला आहे, असे आता स्पष्ट दिसत आहे. या राजीनाम्याचे अनेक पैलू आहेत. परंतु त्यातले दोन पैलू हे शरद पवार यांना न आवडणारे आहेत. हे राजकारणाचा बारकाईने अभ्यास केला असता लक्षात येते. थोडासा तपशीलात विचार करू या. राजीनामा दिल्यानंतरच्या काही तासात त्यांचा हा राजीनामा नैतिक मूल्यांवरून दिलेला आहे असा त्यांच्या पाठीराख्यांनी दावा केला होता. लालकृष्ण अडवाणी यांनी १९९६ साली त्यांच्यावर हवाला प्रकरणात सहभागी असल्याचे आरोप झाल्यानंतर असाच राजीनामा दिला होता आणि जोपर्यंत आपण या आरोपातून मुक्त होत नाही तोपर्यंत लोकसभेची पायरी चढणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. त्यांची चौकशी झाली, ते निर्दोष ठरले आणि मगच गृहमंत्री म्हणून सरकारमध्ये आले.

अजित पवार यांचा राजीनामा असाच आहे असे भासवले गेले. परंतु अडवाणी आणि पवार यांच्यात फरक आहे. अडवाणींची नैतिक बाजू पक्की होती, ते हवाला प्रकरणात सहभागी नव्हते. पण पवारांचे तसे नाही. महाराष्ट्रातल्या वॉटरगेटमध्ये अजित पवारांचा काहीच हिस्सा नाही आणि त्यामुळे ते निर्दोष ठरणार आहेत असे काही नाही. ते त्यात दोषी आहेत. खरोखर चौकशी झाली तर ते सिद्धही होणार आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे कारण नैतिक नसून राजकीय आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे अजित पवार नाराज होते. अशा पृथ्वीराज चव्हाण यांना धडा शिकवला पाहिजे म्हणून अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. आपण राजीनामा दिला की सरकार अस्थिर होईल आणि तोच पृथ्वीराज चव्हाण यांना धडा असेल आणि म्हणूनच आपला राजीनामा हा मुख्यमंत्र्यांसाठी धक्का ठरेल, असा अजित पवार यांचा कयास होता. 

त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला सारा राग पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध काढला. यावरून तर अजित पवार यांना राजीनामा देऊन चव्हाणांनाच लक्ष्य करायचे होते हे लक्षात येते.

एकंदरीत थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर अजित पवार यांच्या राजीनाम्याला राज्यातल्या आघाडी सरकारमधील या दोन पक्षांच्या संबंधांचा संदर्भ आहे. या दोन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले असले तरीही दोघांचे संबंध चांगले नाहीत आणि त्या संबंधांच्या विषयात काही पाऊल उचलायचे असेल तर ते पाऊल उचलण्याचा अधिकार शरद पवार यांना आहे. परंतु अजित पवार यांनी हा निर्णय आपल्या मनाने घेतला. एकप्रकारे त्यांनी काकांच्या अधिकार कक्षेवर आक्रमण केलेले आहे. त्यामुळे काका-पुतण्यातील संबंध दुरावण्यास मदत झाली आहे. राजीनाम्यानंतरच्या एक दिवसामध्ये ही गोष्ट पुरेशी स्पष्ट झालेली नव्हती. परंतु ती आता स्पष्ट व्हायला लागली आहे. आपण राजीनामा दिला की, राष्ट्रवादीचे सारे मंत्री राजीनामे देतील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव येईल, असे अजित पवार यांना वाटले होते. परंतु काकांनी आता अन्य सर्व मंत्र्यांना आपले राजीनामे मागे घ्यायला लावले आहेत आणि अजित पवारांना एकटे पाडले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद म्हणजे शरद पवारांची ताकद आहे, ती अजित पवारांची नाही. हे पुतण्याच्या लक्षात आले नाही आणि राजीनाम्याचे नाटक करून या पुतण्याने नकळतपणे काकांच्या अधिकाराला आव्हान दिले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी केवळ अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना एकटे पाडलेले आहे.

अजित पवार एकटे पडावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांची इच्छा होती. ती आता फलद्रुप होत आहे. अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे असले तरी ते आपले वारस व्हावेत असे शरद पवारांना वाटत नाही. त्यांचा ओढा मुलीकडेच आहे आणि ते साहजिक आहे. योगायोगाने अजित पवार यांची कार्यपद्धती पवार साहेबांना पसंतही नाही. मुळात पवारांचा वारस म्हणून अजित पवार यांचे स्थान बळकट नव्हतेच. त्यातच त्यांनी नैतिक वगैरे कारणावरून राजीनामा देण्याचे नाटक करून शरद पवारांपेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न केला. हीही गोष्ट शरद पवारांना आवडलेली नाही. मात्र आता अजित पवार राजीनामा देऊनच बाजूला सरकत आहेत तर हा खोकला जावा म्हणून पवार साहेबांना वेगळी सुंठ वापरण्याची गरजच राहिलेली नाही. 

अजित पवार हे शरद पवार यांच्या मर्जीतून उतरले आहेत, ही गोष्ट आता हळू हळू राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत झिरपत चालली आहे आणि पवारांचे वारस म्हणून आता आपल्याला अजितदादांना नव्हे तर सुप्रिया ताईंना सलाम करायचे आहे याचे आकलन त्यांना व्हायला लागले आहे. अजित पवारांवर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार आहे.