अजित पवारांचा राजीनामा स्वीकारा: शरद पवार

मुंबई दि.२८- अजित पवार यांच्या राजीनामा प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेत असले तरी ही बैठक केवळ उपचार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अजितदादांचा राजीनामा स्वीकारावा असे बैठकीपूर्वीच झालेल्या भेटीत सांगितले असल्याचेही समजते. 

मुंबईत बैठकीला येण्यापूर्वीच शरदरावांनी महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारला कोणताही धोका नसल्याचे सूतोवाच करून त्यांची काय भूमिका आहे याचे संकेत दिलेच होते. त्यापाठोपाठच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री सोमवारपासून नियमित काम सुरू करतील असेही स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ अजितदादांचा राजीनामा स्वीकारला जाणार असा होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मुख्यमंत्र्यांनी अजितदादांचा राजीनामा अद्यापी राज्यपालांकडे पाठविला नसला तरी तो आज किवा उद्या पाठविला जाईल असेही खात्रीलायक वृत्त आहे.

शरद पवारांच्या या भूमिकेवर अजित दादांचे समर्थक अत्यंत नाराज झाले आहेत. अजितदादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नच त्यामुळे भंगले असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे बैठकीत निदान अजितदादांकडे पक्षसंघटनेची जबाबदारी तरी सोपविली जावी यासाठी शरद पवारांकडे आग्रह धरला जाणार असल्याचेही समजते. कोणत्याही राष्ट्रवादी आमदाराशी चर्चा न करताच शरदरावांनी परस्पर निर्णय घेतल्याने राजीनामा विषय संपला असेही जाहीर केले आहे. त्यांच्या कृतीने  राष्ट्रवादीत शरदरावांचाच शब्द अखेरचा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.रविवारी शरद पवार मुंबईतूनच बँकाँक साठी रवाना होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

Leave a Comment