अजित पवारांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वीकारला आहे. अजित पवार यांच्यावर पक्ष संघटनेतील महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत दाखल झालेल्या शरद पवार यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराबरोबर व्यक्तिश: चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राजीनामा स्वीकारला असल्याचे जाहीर केले आहे.

सिंचन घोटाळा प्रकरणी मोठ्या प्रमाणावर आरोप झाल्याने मंगळवारी अजित पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला. माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर कोणतीही बाब लपून राहणे अशक्य असते असे सांगतानाच श्वेतपत्रिकेद्वारे सिंचन प्रकल्पांचे सत्य समोर येईल. त्यामुळे सिंचनाबाबत लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे पवार म्हणाले.

Leave a Comment