नैतिक (?) धाडस

मानसशास्त्राचा एक नियम असा आहे की, प्रत्येक अडचणीमध्ये एक संधी दडलेली असते. जो अडचणींनी निराश होतो तो कायमचा संपून जातो. पण जो अडचणीवर मात करून तिच्यातल्या संधीचा फायदा घेतो तोच पुढे जातो. राजकारणात तरी ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर सातत्याने होणार्‍या आरोपांमध्ये एक चांगली संधी शोधली. या आरोपांच्या निमित्ताने आपली राजकारणातली प्रतिमा दुरुस्त करून घेण्याचा एक चातुर्यपूर्ण डाव त्यांनी टाकला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या भाषणात नेहमी एक उल्लेख होत असे की, टीका होऊ द्या, टीकेला घाबरू नका. शेवटी जो काही तरी काम करत असतो त्याच्यावरच टीका होत असते.

तेव्हा टीका ही केवळ सहन न करता तिला असे चोख उत्तर देत अजित पवार यांनी आपली प्रतिमा सुधारण्याचा एक धाडशी डाव टाकला आहे. त्यांनी राजीनामा दिला त्यानंतरच्या दोन-चार तासात तरी बर्‍याच लोकांना त्यांच्या राजीनाम्याचा अर्थच कळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तर गोंधळूनच गेले. अशा प्रसंगी राजीनामे देऊ करणे हे निष्ठा व्यक्त करण्याचे एक साधन असते. त्यामुळे त्यांनी दादांच्या पाठोपाठ आपलेही राजीनामे पेश केले. परंतु दादांचा राजीनामा तशा प्रकारचा नाही, त्यांना कोणी बडतर्फ केलेले नाही, त्यांना नैतिक कारणावरून कोणी मंत्रिमंडळातून काढलेले नाही. त्यामुळे त्यांना सहानुभूती दाखवण्यासाठी आपण राजीनामे देण्याची काही गरज नाही याचे या आमदारांना बरेच उशीरा आकलन झाले.

अजित पवार यांनी मोठा नैतिक आव आणून हा राजीनामा दिलेला आहे. आपल्यावरच्या आरोपांची कसलीही चौकशी झाली तरी आपण तिला सामोरे जाण्यास तयार आहोत आणि ती चौकशी होईपर्यंत आपण मंत्रिपदावर राहिलो तर चौकशीवर दबाव आणल्याचा आरोप आपल्यावर होईल आणि चौकशी निःपक्षपाती होणार नाही म्हणून आपण राजीनामा देत आहोत, असे त्यांनी जाहीर केले. चौकशी होऊन आपण स्वच्छ असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण मंत्रिपद स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

त्यांच्या जलसंपदा मंत्रिपदाच्या काळात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रकरण सध्या चर्चेला आलेला आहे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर श्वेतपत्रिका काढण्याचा आग्रह धरलेला आहे. या सगळ्या घटनांमुळे अजित पवार आरोपीच्या पिंजर्‍यात उभे होते आणि त्यांच्याकडे सातत्याने बोट दाखवले जात होते. पण अशा लोकांना त्यांनी चोख उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी आपल्या काळात घडलेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा दिलेला नाही हे येथे मुद्दाम नमूद करावे लागेल. त्यांना अनेकांना चोख उत्तर द्यायचे होते आणि राजकारणातली आपली प्रतिमा सुधारायची होती म्हणून त्यांनी हा राजीनाम्याचा डाव टाकलेला आहे.

अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्या या वाटचालीत अडथळे आणणार्‍या अनेकांना उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांच्या या राजकीय डावामागे आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्रीच त्यांच्याविरुद्ध होते आणि अजित पवार यांचे आघाडीतले वर्चस्व कमी करण्यासाठी ते श्वेतपत्रिकेचा डाव टाकत होते. आता अजित पवार यांनी त्यांना श्वेतपत्रिका प्रसिद्ध कराच, असे आव्हानच दिले आहे. आपली प्रतिमा स्वच्छ असावी यासाठी कमालीचे दक्ष असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी अजित पवार यांची प्रतिमा बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि खुद्द अजित पवार यांच्या मनामध्ये होती. म्हणून या राजीनाम्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरही मोठा पेच निर्माण झालेला आहे.

अजित पवार यांचे खच्चीकरण करण्यास केवळ मुख्यमंत्रीच टपलेले होते असे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट सुद्धा अजित पवार यांचे पाय ओढण्यास उत्सुक होता. अशा लोकांना अजित पवार यांनी ही चपराक लगावली आहे. छगन भुजबळ, सुनील तटकरे, गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीचे तीन मंत्री आणि राजेंद्र दर्डा हे काँग्रेसचे मंत्री यांच्याभोवती भ्रष्टाचाराचे आरोपांचे मोहोळ उठलेले आहे. परंतु त्यातला एकही मंत्री राजीनामा देत नाही. पण अजित पवार मात्र आरोप होताच राजीनामा देतात आणि क्लिन चीट मिळेपर्यंत मंत्रिपदी राहणार नाही अशी घोषणा करतात त्यातून या भ्रष्ट मंत्र्यांना चपराक तर मिळतेच पण अजित पवार यांची प्रतिमा मोठी होते आणि राष्ट्रवादीमधल्या गटबाजीला एक चोख उत्तर दिले जाते.

शरद पवार यांचा वारस कोण, असाही एक वाद आहे. अजित पवार यांची बॉडी लँग्वेज, अविचाराने बोलणे आणि कार्यकर्त्यांशी फटकळपणे वागणे यामुळे ते शरद पवार यांचे वारस होऊ शकणार नाहीत असे कुजबुजले जात असते. त्या तुलनेत सुप्रिया सुळे थोडकेच बोलतात, वादग्रस्त विधान करत नाहीत. त्यामुळे त्या अजित पवार यांच्यापेक्षा भारी ठरायला लागल्या होत्या. परंतु अजित दादांनी राजीनामा देऊन याही तुलनेतले आपले पारडे जड करून घेतले आहे. म्हणजे राजीनाम्याच्या एका दगडात त्यांनी मारलेल्या अनेक पक्ष्यांमध्ये काका आणि बहीण हेही दोन पक्षी आहेत.