राहुल गांधींवर आरोप बदनामीच्या उद्देशानेच: सीबीआय

नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर एका युवतीला अपहृत करून तिच्यावर बलात्कार केल्याचे आरोप केवळ बदनामीच्या उद्देशाने करण्यात आले असून त्यात कोणतेही तथ्य नाही; असे केंद्रीय अन्वेषण विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात नमूद केले. ज्या तरुणीच्या संदर्भात हे आरोप करण्यात आले; तशी व्यक्तीच अस्तित्वात नसल्याचा दावाही सीबीआयने केला.

माजी आमदार किशोर समरिते यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात राहुल यांच्या विरोधात अपहरण आणि बलात्काराचे आरोप करणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका तद्दन बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने उच्च न्यायालयाने समरिते यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश देतानाच समरिते यांना ५० लाख रुपये दंडही ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका समरिते यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्याची सुनावणी सुरू आहे. राहुल यांच्या विरोधात खोटी याचिका आपल्या अशिलाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सांगण्यानुसार केल्याचे समरिते यांच्या वकिलाने मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात सांगितले; तर आपल्या याचिकेचा न्यायालयीन खर्च ‘अन्य कोणी’ करीत असल्याचे समरिते चौकशी दरम्यान सांगत असल्याचा सीबीआयचा दावा आहे.

राहुल यांनी ज्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा समरिते यांचा दावा आहे; त्या नावाची कोणतीही तरुणी, तिचे पालक अथवा तिच्याशी संबंधित व्यक्ती याचिकेत नमूद केलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचे सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

समरिते यांनी अखिलेश यादव यांच्यावर केलेला आरोपही उतरप्रदेशचे वकील राकेश द्विवेदी आणि अतिरिक्त महाअधिवक्ता गौरव भाटीया यांनी फेटाळून लावला. यापूर्वी मूळ याचिकेत; आव्हान याचिकेत अथवा सीबीआयला दिलेल्या जबाबात समरिते यांनी कोठेही ही बाब उघड न केल्याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. अशाप्रकारचे निराधार आरोप करून समरिते फुकट प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केला.