मुख्यमंत्री चव्हाण दिल्लीत सोनियांना भेटले

नवी दिल्ली दि.२४- केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदल आणि दोन राज्यातील नेतृत्त्व बदलाची चर्चा दिल्लीत रंगली असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत अहमद पटेल आणि गुलाब नबी आझादही उपस्थित होते असे समजते. पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा दिल्लीत बोलविले जाईल अशी चर्चा गेले काही दिवस सातत्याने सुरू असून महाराष्ट्राचे मंत्री नारायण राणे आणि पतंगराव कदम यांनीही नुकतीच सोनियांची भेट घेतल्याने पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेतले जाईल असे संकेत मिळत होते.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र सोनियांशी भेट घेतल्यानंतर त्यांना दिल्लीत परत बोलविण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की महाराष्ट्रात त्यांना अजून अनेक अपुरी कामे पूर्ण करायची आहेत. अर्थात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो पक्षाच्या भल्यासाठीच असणार आहे आणि पक्षाने सोपविलेले हे काम मी करतच राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल दिल्लीत अनेकांच्या भेटी घेतल्या होत्या त्यासबंधी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधानांना ते जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हातेव्हा महाराष्ट्रापुढील अडचणींची माहिती देण्यासाठी आणि त्यावरच्या उपाययोजनांसंबंधी चर्चा करण्यासाठीच भेटतात.

महाराष्ट्रात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील संबंध तणावाचे बनले असून चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीकडून अकार्यक्षमतेचा आरोप सातत्याने केला जात आहे त्यामुळे चव्हाणांना परत दिल्लीत बोलावले जाईल असे सांगितले जात होते मात्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तणाव नाही तर कांही मतभेदाचे मुद्दे आहेत आणि ते चर्चा करून सोडविले जातील असे सांगितले.

Leave a Comment