बोले सो निहाल…

नवी दिल्ली: देशाच्या आर्थिक विकासासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता असून शासन त्या अमलात आणण्यासाठी कटिबद्ध आहे; अशी ग्वाही देतानाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा राबविताना कोणत्याही विरोधाला जुमानणार नसल्याची तंबीही दिली आहे. कठीण काळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने उल्लेखनीय कार्य केल्यामुळेच देशाने आर्थिक प्रगतीचा हा टप्पा गाठल्याचेही त्यांनी नमूद केले.

संपुआ सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या धोरण लकव्याबाबत देशातूनच नव्हे तर जगभरातून टीकेची झोड उठल्यावर मनमोहन सिंग सरकारने आक्रमक भूमिकेचा अंगीकार केला आहे. तृणमूल काँग्रेससारख्या संख्यने दुसर्‍या क्रमांकाच्या सहयोगी पक्षाचीही तमा न बाळगता सरकारने डीझेल दरवाढ, सिलेंडरचे रेशनिंग आणि रिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीला मान्यता अशा सुधारणा धडाक्याने अमलात आणल्या. आता जावे लागले तरी लढत लढत जाऊ; अशी आक्रमक भाषा सौम्य प्रकृतीचे पंतप्रधान करू लागले आहेत.

संपूर्ण जगाला मंदीने ग्रासले असूनही भारताची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे; याचे श्रेय सरकारच्या धोरणांना देऊन पंतप्रधान नियोजन आयोगाच्या बैठकीत म्हणाले की; देशाने ८.२ विकास दराचे लक्ष्य ठेवले आहे. आर्थिक सुधारणा हा सरकारचा प्राधान्यक्रमाचा विषय असून त्यासाठी कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्याची सरकारची तयारी आहे.

Leave a Comment