सोनिया, राणे भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांची कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नसले तरीही या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रात परत बोलाविण्याबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग हे आग्रही आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात काँग्रेसकडे योग्य पर्याय उपलब्ध नाही. विशेषत: विलासराव देशमुखांचे निधन आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे नुकतीच सोपविण्यात आलेली केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी या पार्श्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्वासाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सोनिया, राणे या भेटीने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. राणे यांनी मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा कधीही लपवून ठेवलेली नाही. सध्या राज्यात सहयोगी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तोंड देऊ शकेल अशा आक्रमक आणि प्रभावी नेत्याची राज्य काँग्रेसकडे वानवाच आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांच्या महत्त्वाकांक्षेने डोके वर काढले असले तर ते अनपेक्षित नाही.

Leave a Comment