कोळसाकांडाचा आरोप हे भाजपचे थोतांड: नारायण सामी

इटानगर: कोळसाकांडाबाबत भारतीय जनता पक्षाचे आरोप हे थोतांड असून गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप कोळसा खाण वाटपाचे राजकारण करीत असल्याचा आरोप पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री नारायण सामी यांनी केला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेले खाण वाटप रद्द करण्याची मागणी करणारा भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात झालेले वाटप रद्द करण्याची मागणी का करीत नाही; असा सवालही त्यांनी केला.

खाण वाटपाच्या प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. आवश्यक वाटल्यास खाण वाटप रद्दही केले जाईल. मात्र भाजपचा खाण वाटपाला असलेला विरोध हा राजकीय लाभासाठी आहे; अशी टीका सामी यांनी केली. कोळसा खाण घोटाळ्यात भाजपचेच हात बरबटलेले असून त्यांच्या भानगडी पुढे येऊ नयेत यासाठी भाजपने संसदेचे कामकाज १३ दिवस बंद पाडून जनतेचे नुकसान केले; असे सामी म्हणाले.

वास्तविक कोळसा खाण वाटपातील वस्तुस्थिती आकडेवारीसह जनतेसमोर यावी अशीच सरकारची भूमिका होती. कोळसा खाण वाटपातील अनियमितता शोधून त्यावर उपाय सुचविण्यासाठी नियुक्त केलेला मंत्रिगट याबाबत आवश्यक शिफारशी करेल; असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा कोळसा खाण वाटप लिलावानेच केले जावे; असा आग्रह असला तरीही मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी त्याला विरोध केल्याचे सांगून सामी यांनी त्याच्या समर्थनार्थ या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिव यांनी या संदर्भात दिलेली पत्रेच पत्रकारांना दाखविली.

Leave a Comment