मनमोहनसिंगांच्या भेटीसाठी पाकिस्तानचे कसून प्रयत्न

लंडन दि .१० – पाकिस्तानातील शीख धर्मगुरू गुरू नानक यांचे जन्मस्थळ असलेल्या नानकन साहिबच्या भेटीसाठी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या वाढदिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला पाकिस्तानला भेट द्यावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती पाकिस्तानी अधिकार्‍यानी लंडन येथील लिडिंग इंटरनॅशनल अफेअर डिपार्टमेंटला दिली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी यांनीही या वर्षअखेर पंतप्रधान मनमोहनसिंग पाकिस्तान भेटीवर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. रब्बानी यांचे वक्तव्य आणि वरील माहिती जुळत असल्याने तशा हालचाली खरोखरच सुरू असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीने सिंग यांनी या वर्षातच पाकिस्तान भेटीवर यावे यासाठी आग्रह धरला आहे. त्यामागे पाकिस्तानात २०१३ मध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकाही त्यांच्या डोळ्यासमोर असाव्यात असाही अंदाज आहे. कारण त्यांच्या पक्षाकडून आणि पाकिस्तानातील अन्य गटांकडूनही भारताशी संबंध सुधारण्याबाबत झरदारी यांच्यावर दबाव येत आहे. मनमोहनसिंग पाकिस्तान भेटीवर गेले तर त्याचा फायदा पाकिस्तान पिपल्स पक्षाला निवडणुकांत होऊ शकणार आहे.

अर्थात भारताने मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील जे गुन्हेगार पाकिस्तानात आश्रयास आहेत त्यांच्याबाबत कठोर कारवाई केल्याशिवाय पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीचा विचार केला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. तज्ञांच्या मते पाकिस्तान जेव्हा जेव्हा अडचणीत येते तेव्हा भारताचे गोडवे त्यांच्याकडून गायले जातात. सध्या देशातील आर्थिक दिवाळखोरी, दहशतवादी हल्ल्यांची टांगती तलवार तसेच अफगाणिस्तानशी ताणलेले संबंध आणि बिग ब्रदर अमेरिकेबरोबरचे तुटल्यात जमा झालेले संबंध अशा अनेक अडचणींचा सामना पाकिस्तानला करावा लागत आहे.

Leave a Comment