प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या हातात प्रत्येक क्षणी निळ्या स्टोनचे ब्रेसलेट हमखास दिसतेच. हे ब्रेसलेट माझ्यासाठी खूप लकी आहे, अशी प्रतिक्रियाही त्याने एका मुलाखतीदरम्यान दिली होती. मात्र, ’एक था टायगर’ या चित्रपटात त्याच्या हातात हे ब्रेसलेट दिसले नाही, त्यामुळे सलमानने ब्रेसलेटचा नाद सोडला की काय, अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये आहे.
सलमानची बहीण अलविरा खान म्हणाली, ’सलमानने वडिलांनी बनविलेले हे ब्रेसलेट कधीही दूर ठेवले नाही. प्रत्येकवेळी त्याच्या हातात हे ब्रेसलेट पाहायला मिळतेच. याबाबत तो खूप संवेदनशील आहे. मात्र, ’एक था टायगर’ या चित्रपटात सलमान ’रॉ एजन्ट’च्या भूमिकेत होता. ’रॉ एजन्ट’च्या हातात ब्रेसलेट योग्य वाटणार नाही. त्यामुळेच त्याने हे ब्रेसलेट बाजूला ठेवले.’
यापूर्वी काही दिग्दर्शकांनी भूमिकेदरम्यान सलमानला ब्रेसलेट काढून ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, त्याला सलमानने स्पष्ट नकार दिला होता. त्यावर उपाय म्हणून सलमानच्या हातातले ब्रेसलेट दिसणार नाही, असे चित्रीकरण करण्याचा आदेश दिग्दर्शकांनी कॅमेरामनला दिला होता.
मात्र आगामी ’दबंग २’ या चित्रपटाद्वारे सलमान प्रेक्षकांसमोर येत आहे. यामध्येही सलमानने ब्रेसलेट घातलेले नाही. त्यामुळे सलमानने ब्रेसलेटचा नाद सोडला की काय, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.