शरीरावर भारताचा नकाशा हीच त्याची जन्मखूण

मुजफ्फरनगर – त्याच्या’ शरीरावर मोठी जन्मखूण असल्याने तो बालपणी  चर्चेचा विषय बनलेला हा मुलगा आता  विशीत पोहोचला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण या  जन्मखुणेने  आता चक्क भारतीय नकाशाचा आकार घेतला आहे. नुकतेच त्याचे नाव लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आले आहे.

अमित सिंघल हा २५ वर्षीय तरूण मुजफ्फरनगर जिल्ह्यातील नवी मंडी क्षेत्रात राहणारा आहे. अमितच्या शरीरावर दिसणारी ही आकृती म्हणजे काही कोरलेला टॅटू नाही. अमितचा जन्म झाला तेव्हाच त्याच्या शरिरावर एक मोठी खूण आहे अशी चर्चा सुरू झाली होती. तो जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्या आकृतीनेही वेगळा आकार घेण्यास सुरुवात केली. आता या आकृतीने चक्क आशिया खंडातील भारतीय उपखंडाच्या भौगोलिक भागाचा आकार घेतला आहे. त्यात भारताची किनार ओळखता येईल अशी अगदी ठळकपणे दिसते. इतकेच नाही तर पकिस्तानचा भाग आणि श्रीलंकेचा भागही या आकृतीत निसर्गत  निर्माण झाला आहे. अमितच्या घरातील मंडळी या प्रकाराला देशभक्तीचे नाव देत आहेत. शरिरावरील या आकृतीमुळेच त्याचे नाव नुकतेच लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अमितच्या शरिरावर असलेली ती जन्मखूण बघून याला निसर्गाचा चमत्कार म्हणावा की आणखी काही असाच प्रश्न पडतो. अनेकांना जन्मखूण असलेली आवडत नाही कारण कुटुंबातील मंडळी त्याच्यासोबत नकोनको त्या गोष्टी जोडतात. पण अशी वैशिष्टपूर्ण जन्मखूण ही आता अमितसाठी आता गौरवाची गोष्ट झाली आहे.

लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी अमितला आधी वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागले. वैद्यकीय चाचणीतून हे स्पष्ट झाले की त्याच्या शरीरावरील आकृती ही कोरलेली नसून ती जन्मापासूनच आहे. भारताचा नकाशा माझ्या छातीवर जन्मापासूनच आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दात अमितने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर अमितची बहिणही त्याच्या या जन्मखूणेबद्दल अभिमान व्यक्त करते.

दरम्यान, वैज्ञानिक दृष्ट्या शरीरावर अशी आकृती बनणे अशक्य आहे, असे मुजफ्फरनगरचे डॉ. व्हि. के. जौहरी यांचे म्हणने आहे. ही आकृती म्हणजे त्वचा रोग असू शकतो असेही त्यांचे म्हणणे आहे.