चेन्नई – अपवाद वगळता अपघातग्रस्तांना विमा मिळविण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या किती खेट्या घालाव्या लागतात हे सांगण्याची गरज नाही. बस अपघातात हात गमवाव्या लागलेल्या नाभिकाला पाच लाख रुपये एवढी नुकसान भरपाई द्यावी काय? आपणही विचारात पडला असाल, मात्र ’आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन’ या म्हणीचा प्रत्यय नुकताच येथील एका नाभिकाला आला.
आंधळा मागतो एक अन् देव देतो दोन
कामाचा उजवा हात अपघातात ’कामी’ आल्याने येथील नाभिक पी. सेल्वन यांना सव्वापाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली होती. मात्र, सव्वापाच लाखांची मागणी जास्त वाटल्याने सरकारी नॅशनल इन्शुरन्स कंपनीने (एनआयसी) त्या नाभिकाला उच्च न्यायालयात खेचले. मद्रास उच्च न्यायालयाने ’एनआयसी’ची बाजू ऐकून घेतल्यावर या याचिकेला अपवाद करीत चक्क ११ लाख रुपयांची नुकसान भरपाई त्या नाभिकाला सव्याज देण्याचा आदेश कंपनीला दिला.
उजवा हात सर्वांनाच महत्त्वाचा वाटतो. त्यात भारतीय संस्कृतीत उजव्या हाताला डाव्याच्या तुलनेत शुभ मानले जाते. या बाबी गौण मानल्या तरी केस कापणे, मालिश करणे अशी कौशल्यपूर्ण कामे करण्यासाठी नाभिकाच्या दृष्टीने उजव्या हाताचे काय महत्त्व आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. हे लक्षात घेऊन न्यायमूर्ती एस. विमला म्हणाल्या, ’एका नाभिकाने चूक नसताना उजवा हात गमावणे म्हणजे त्याला संपूर्ण अपंगत्व आल्यासारखेच आहे.
’
पी. सेल्वन हे मदुराई येथे केशकर्तनालय चालवित होते. एक सप्टेंबर २००३ रोजी सेल्वन प्रवास करीत असलेल्या एस.टी. बसला समोरून एक व्हॅन जोरात घासली. त्यामध्ये सेल्वन यांचा हात खाद्यांपासून चिरडला गेला. सेल्वन यांनी जेव्हा मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे सहा लाखांची नुकसान भरपाई मागितली तेव्हा त्यांचे मासिक उत्पन्न तीन हजार रुपये गृहीत धरून सव्वापाच लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. ’एनआयसी’ने या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सेल्वन यांना न्याय मिळाला!
