प्रियंका गांधी लोकसभा निवडणुक रिंगणात?

नवी दिल्ली दि.७- राजकीय क्षेत्रात गांधी परिवारातील प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा वारंवार केली जात असतानाच आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकात प्रियंका सक्रीय राजकारणात प्रवेश करेल असे संकेत मिळत आहेत. झी रिसर्च ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणानुसार विश्लेषकांच्या मते देशात ज्या प्रभावशाली राजकीय फॅमिली आहेत, त्यांनी नेहमीच आपली मुले आणि पत्नी यांनाच राजकारणात पुढे आणण्याचे प्रयत्न केले आहेत आणि गांधी फॅमिलीही त्याला अपवाद नाही.

राहुल गांधी यांना राजकारणात उतरून आता दहा वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे प्रियंकाचे पती रॉबर्ट वधेरा यांनी उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांदरम्यान राजकारणात सक्रीय होण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र रॉबर्टला मागे सारून प्रियंकाचेच प्यादे पुढे सरकविले जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. रॉबर्टच्या राजकारण प्रवेशाची मात्र कोणतीही चिन्हे नाहीत.

भारतात ज्या राजकीय कुटुंबातील पुढच्या पिढ्या राजकारणात आल्या आहेत त्यासर्वांत गांधी कुटुंबाला अधिक टार्गेट केले जाते आहे. पंजाबमधील बादल कुटुंब, उत्तरप्रदेशातील यादव , बिहारमध्ये लालू प्रसाद यांची पत्नी राबडीदेवी, तसेच दोन मेव्हणे ,काश्मीरचे अब्दुल्ला, देवेगौडा आणि त्यांचे पुत्र, अशी ही प्रचंड मोठी यादी आहे. विशेष म्हणजे या सर्व यादीत कुटुंबातील मुले, सुना बायका यांनाच पक्षाच्या नेत्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे.मग राहुल आणि प्रियंकाला संधी दिली तर त्यात गैर काय असाही सवाल केला जात आहे.

सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मात्र पुतणे अजित पवार यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी खास प्रयत्न केले आहेत. पवारांची कन्या सुप्रिया खासदार असली तरी तिचा राजकारण प्रवेश बर्‍याच उशीरा झाला असून अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि गेली अनेक वर्षे काकांच्या सल्ल्याने राजकारण करत आहेत हे विशेष.

Leave a Comment