दिवाळीत सोने ३५ हजारांवर ?

मुंबई दि.७ – गेल्या आठवड्यापासून दररोज दराचा नवा विक्रम नोंदविणार्‍या मौल्यवान सोन्याचे दर दिवाळीपर्यंत ३५ हजार रूपयांची पातळी ओलांडतील असा अंदाज बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत. सोन्याचे दर वाढण्यामागे वाढलेली मागणी हे मुख्य कारण नसून सट्टेबाजांमुळे सोन्याची सध्याची दरवाढ होत आहे असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सोने दरवाढीच्या अन्य कारणांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा वधारलेला भाव कारणीभूत आहे तर भारतीय बाजाराचा विचार करता व्याजदरांत करण्यात आलेल्या कपातीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. दिल्लीत सोन्याने काल ३२ हजार रूपयांची पातळी ओलांडली आहे तर मुंबईत हा भाव ३१८५० रू.प्रति १० ग्रॅम असा होता.

सणासुदीचे दिवस आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे भारतीय बाजारात सोन्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे आगामी कांही दिवस तरी सोन्याचे दर खाली येण्याची कोणतीही शक्यता नाही उलट दिवाळीपर्यंत ते चढेच राहतील असे सराफी व्यावसायिकांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकने मात्र सोने ग्राहकांनी व त्यातही गरीब ग्राहकांनी सोन्यापासून सध्या दूरच राहावे असा सल्ला दिला आहे. गेल्या तीन वर्षात भारतात सोन्याचे दर दुप्पट झाले असून १ जानेवारीला हा दर १६६०० रू. प्रति दहा ग्रॅम होता तो आज ३२ हजारांची पातळी ओलांडून पुढे गेला आहे.