साईनाकडून पॅरालिंपिक विजेत्या गिरीशला बक्षीस

नवी दिल्ली दि.७ – लंडन ऑलिंपिकमध्ये बॅडमिटनचे कांस्य पदक मिळविणार्‍या साईना नेहवालने देशातील श्रीमंत खेळांडूंना नवा आदर्श घालून दिला आहे. लंडन येथील पॅरालिंपिक स्पर्धेत उंच उडीत रौप्य पदकाची कमाई करणार्‍या एच एन गिरीश या खेळाडूला तिने स्वकमाईतून दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत खेळताना तंदुरूस्त खेळाडूलाही किती कठोर मेहनत करावी लागते याची आपल्याला जाणीव आहे त्यामुळेच डाव्या पायाने अधू असूनही ऑलिंपिकमध्ये देशासाठी रौप्य पदक मिळविणार्‍या गिरीशचा आपल्याला अभिमान वाटतो असे साईनाही म्हटले आहे. ती म्हणते माझ्यातर्फे ही त्याला छोटीशी भेट आहे. त्याचा थोडाफार तरी त्याला उपयोग होऊ शकेल अशी आशा आहे.गिरीशने देशासाठी मोठाच पराक्रम केला आहे.

लंडनहून परतल्यानंतर गिरीशला हे बक्षीस देण्यात येणार आहे. गिरीशने पॅरालिंपिक स्पर्धेत १.७४ मीटर उंच उडी मारून रौप्य पदक मिळविले आहे. गिरीशचे वडील रोजंदारीवर काम करतात आणि त्याच्या पायावर सर्जरी करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नाही. पदक जिकल्यानंतर सरकारने पॅरालिंपिक स्पर्धेत उतरणार्‍या खेळांडूंकडेही अधिक लक्ष पुरवावे अशी गिरीशची अपेक्षा आहे.

Leave a Comment