वॉशिंग्टन पोस्टचा पंतप्रधान कार्यालयाकडून निषेध

नवी दिल्ली: पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारा वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेला लेख एकांगी, अनैतिक आणि व्यावसायिकतेच्या तत्वाचा भंग करणारा असल्याची टीका पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग हे अत्यंत भ्रष्ट सरकारचे प्रभावहीन नोकरशहा नेते आहेत; अशी टीका करणारा लेख वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील प्रतिष्ठीत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. या लेखाबाबत निषेध व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांचे प्रसिद्धी सल्लागार पंकज पचौरी यांनी वॉशिंग्टन पोस्ट व्यवस्थापनाला पाठविले आहे.

सरकारवर टीका करण्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. तो माध्यमांचा हक्कच आहे. मात्र या लेखातील अनैतिक आणि अव्यावसायिक बाजूकडे लक्ष वेधण्यासाठी हे निषेधाचे पत्र देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. आमच्याकडून संवादाचे दरवाजे खुले असताना हा लेख लिहिणारे पत्रकार सायमन डेन्यर यांनी आमची बाजू समजावून घेण्यासाठी कोणताही संपर्क केला नाही. त्यामुळे हा लेख पूर्णपणे एकांगी झाला आहे; अशी टीका या पत्रात करण्यात आली आहे.

डेन्यर यांनी मुलाखतीसाठी वेळ मिळावा या आपल्या विनंतीला पंतप्रधान कार्यालयाकडून नकार देण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात त्यांची विनंती नाकारण्यात आली नव्हती तर संसदेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत वेळ मिळणार नाही; असे कळविण्यात आल्याचा दावा पचौरी यांनी पत्रात केला आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या प्रतिनिधींकडून अधिक दर्जेदार आणि निष्पक्ष वार्तांकनाची अपेक्षाही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Comment