त्याने चक्क ८ लाखाच्या हिर्‍याचा केला फराळ

श्रीलंकेत दरवर्षी भरविल्या जात असलेल्या जवाहिर आणि हिरे माणकांच्या प्रदर्शनात एका चीनी तरूणाने हिरा पाहण्याचे निमित्त करून तो चक्क खाऊन टाकल्याचा प्रकार घडला. सुमारे १४ हजार डॉलर्स म्हणजेच ७ लाख ८० हजार रूपये इतकी या हिर्‍याची किंमत आहे. अर्थात पोलिसांनी या हिरेखादाडाला पकडून रूग्णालयात हलविले आहे आणि लॅक्झॅटीव्ह देऊन हा हिरा त्याच्या पोटातून कधी बाहेर येतो याची प्रतीक्षा पोलिस करत आहेत.
 
घडले असे की हा चीनी तरूण संबंधित स्टॉलवर आला आणि हिरा जवळून न्याहाळण्याचे निमित्त करून त्याने तो हातात घेतला आणि बघताबघता चक्क गिळून टाकला. आपल्याकडे हिरा गिळला की माणूस मरतो असा समज आहे. ( आठवा मुकद्दर का सिकंदर – रेखा हिरा गिळून मरते तो प्रसंग ) पण चीनी तरूणाने हा समज खोटा पाडला. स्टॉलमालकाच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याने तातडीने पोलिसांना सावध केले. पोलिसांनीही या तरूणाची वरात रूग्णालयाकडे नेली. तेथे त्याचा एक्स रे घेण्यात आला तेव्हा पोटात खड्यासारखी कांहीतरी वस्तू आढळली. लगेच या तरूणाला लॅक्झॅटिव्ह देण्यात आले . आता हिरा कधी बाहेर येतोय हे पाहायचे !

Leave a Comment