आता पडद्यावर धूम्रपानाच्या दृश्यांना परवानगी

नवी दिल्ली: केंद्र सरकार चित्रपटात धूम्रपानाची दृश्य प्रदर्शित करण्यास अनुमती देणारे परिपत्रक लवकरंच जारी करेल; अशी ग्वाही सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

चित्रपटात धूम्रपानाची दृश्य प्रदर्शित करण्यास सध्या मनाई आहे. मात्र हिरोईन या चित्रपटात महिला धूम्रपान करीत असल्याचे दृश्य असून अशा दृश्यांना प्रदर्शित करण्याची परवानगी मिळावी यासाठी निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. पी. सदाशिवम आणि न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. धूम्रपानाची दृश्य पडद्यावर दिसत असताना धूम्रपान आरोग्यास हानिकारक असल्याचा संदेश सुरू ठेवण्याच्या निर्देशासह सरकार धूम्रपानाच्या दृश्यांना परवानगी देईल; असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. हा संवैधानिक इशारा धूम्रपानाच्या दृश्याबरोबरच चित्रपटाच्या सुरुवातीला; मध्यंतरापूर्वी आणि चित्रपटाच्या अखेरीला प्रदर्शित करण्याची सक्ती करण्याची सूचना न्यायालयाने केली.

या याचिकेचा निकाल लागण्यापूर्वी ‘हिरोईन’ प्रदर्शित करण्याची मुभा मिळावी; ही याचिकाकर्त्यांची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळून लावली.