पुणे दि.३ – भारतीय चित्रपटसृष्टीची मूहूर्तमेढ रोवणारा दादासाहेब फाळके यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट आता पार्श्वसंगीतासह डीव्हीडीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. नॅशनल फिल्म अकाइव्हजने त्यासाठी सात लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या डिव्हीडीत दादासाहेब फाळके यांनीच निर्मिलेला १९१९ सालचा कालिया मर्दन आणि कालिपद दास यांचा १९३१चा जमाई बाबू हेही चित्रपट समाविष्ट करण्यात आले आहेत.
राजा हरिश्चंद्र आता डिव्हीडीवर
दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपट तयार केल्यानंतर ३ मे १९१३ साली हा चित्रपट मुंबईतील कोरोनेशन सिनेमात प्रथम प्रदर्शित करण्यात आला. आज ९९ वर्षांनंतर इतिहास निर्माण करणारा हा चित्रपट डीव्हीडीत रूपांतरीत करण्यात आला असून त्यामुळे आणखी एक नवा इतिहास रचला गेला आहे असे या डीव्हीडीचे उद्घाटन करताना अकाईव्हजचे संचालक प्रदीप पाठराबे यांनी सांगितले. अत्यंत घरगुती वातावरणात आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. या चित्रपटाला त्याकाळचे वाटेल असे संगीत देण्याची महत्त्वाची जबाबदारी राहुल रानडे आणि नरेंद्र भिडे यांनी पार पाडली आहे.
विशेष म्हणजे डीव्हिडीचे प्रकाशन होताच अनेकांनी या डिव्हीडी खरेदी केल्या. यानंतरही अकाईव्हजकडे असलेल्या अन्य मूकपटांच्या डिव्हीडीज बनविण्याचा संस्थेचा विचार असून त्यात बाबूराव पेंटर यांचा १९२७ सालचा सति सावित्री, मुरलीवाला या चित्रपटांचा तसेच १९२५ सालच्या हिमांशू रॉय यांच्या लाईट ऑफ एशिया या चित्रपटाचा समावेश आहे असे सांगण्यात आले. दादासाहेब फाळके यांनी तब्बल १३० चित्रपटांची निर्मिती केली होती अशी माहिती त्यांच्या नातीने दिली.
