तिसर्‍या आघाडीची दंड थोपटणी

कोळसा खाणीतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भारतीय जनता पार्टीने संसदेचे कामकाज ठप्प करण्याचा विडा उचलला आहे. परंतु कोळसा भ्रष्टाचाराबद्दल तेवढेच नाराज असलेल्या अन्य काही पक्षांनी मात्र थोडी वेगळी भूमिका घेतलेली आहे. या काही पक्षांमध्ये स.पा. नेते मुलायमसिग यादव यांनी पुढाकार घेतला आहे आणि कोळसा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या विरोधात काही पक्षांना संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पक्षांमध्ये आता तेलुगु देसम, बिजू जनता दल, अण्णा द्रमुक आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पक्षांचा समावेश होण्याची शक्यता आहे. एकंदरीत कोळसा प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणातून आजवर थंड पडलेल्या तिसर्‍या आघाडीत धुगधुगी आणण्याचा एक प्रयत्न मुलायमसिग यादव यांच्याकडून केला जात आहे. मुलायमसिग यादव यांना कोळशाच्या खाणींमध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे मान्य आहे. परंतु त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी संसदेवर बहिष्कार घालण्याची, अजिबात चर्चा न करण्याची आणि पंतप्रधानांचा राजीनामा मागण्याची भाजपाची भूमिका त्यांना मान्य नाही.

किबहुना कोळशाच्या भ्रष्टाचारात भाजपाचेही हात काळे झालेले आहेत, असे मुलायमसिग यादव यांचे म्हणणे आहे. भाजपाचाही या भ्रष्टाचारात हात आहे आणि तो उघड होऊ नये यासाठी भाजपाला चर्चा नको आहे. म्हणून भाजपा नेते चर्चेला तयार होत नाहीत आणि केवळ पंतप्रधानांचा राजीनामा या एकाच गोष्टीवर ते अडून बसले आहेत. म्हणून मुलायमसिग यादव यांनी भारतीय जनता पार्टीच्याही विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निदर्शनातून भाजपाच्या संसद बंद पाडण्याच्या कृतीचा निषेध केला जाणार आहे. मुलायमसिग यादव यांनी कोळसा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे आणि चर्चा आणि चौकशी या दोन गोष्टींचा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या या सगळ्या भूमिकांशी अद्रमुक, बिजद आणि काही डावे पक्ष सहमत आहेत की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु भारताच्या राजकारणामध्ये कोळशाच्या भ्रष्टाचारावरून काँग्रेस आणि भाजपाला वगळून तिसर्‍या भूमिकेवर काही राजकीय पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भूमिकेवर मुलायमसिग यादव कोणाकोणाला आणू शकतात यावरून या प्रश्नाची तड लागण्याची शक्यता ठरणार आहे.

मुलायमसिग यादव संघटित करू पाहत असलेल्या या तिसर्‍या भूमिकेमध्ये आता जे पक्ष येत आहेत त्या पक्षांपेक्षाही ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष, शरद पवार यांचा राष्ट*वादी काँग्रेस पक्ष आणि करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष येतो की नाही याला जास्त महत्व आहे. हे तीन पक्ष मुलायमसिग यादव यांच्या मागे आले तर सरकारवर त्यांची भूमिका मान्य करण्याच्या बाबतीत दबाव येणार आहे. कारण या तीन पक्षांच्या संख्याबळावरच केंद्रातल्या मनमोहनसिग यांच्या सरकारचे स्थैर्य अवलंबून आहे. म्हणजे ममता बॅनर्जी, करुणानिधी आणि शरद पवार हे तिघेच कोळसा भ्रष्टाचाराची कोंडी फोडण्याच्या बाबतीत निर्णायक भूमिका वठवू शकणार आहेत. या तिघांनी अजून पुरेसे संकेत दिलेले नाहीत. परंतु ममता बॅनर्जी यांनी काही गोष्टी सूचित केलेल्या आहेत आणि त्या कोणत्याही क्षणी सरकारच्या विरोधात जाऊ शकतात. पवार आणि करुणानिधी फारशी काही गडबड करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. कारण त्यांना त्यांचेच प्रश्न सतावत आहेत. शरद पवारांना अनेक पेचप्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे आणि करुणानिधी यांचा पक्ष भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या खटल्यांच्या जाळ्यात गुंतून पडलेला आहे. संपु आघाडीच्या विरोधात फार मोठी निर्णायक भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत ते नाहीत.

या सगळ्या राजकारणातून मध्यावधी निवडणुकांची चर्चा उदयाला आलेली आहे. कारण पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर किवा ममता बॅनर्जींनी पाठींबा काढून घेतला तर सरकार कोसळू शकते. ममता बॅनर्जींनी काही गडबड केली तर मुलायमसिगांचा पाठींबा घ्यावा असा विचार काँग्रेसमध्ये व्यक्त केला जात होता. पण तो आता मागे पडला आहे. तेव्हा मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. पक्ष कोणताही असला तरी त्या पक्षाचे खासदार शक्यतो मध्यावधी निवडणुकांना राजी नसतात. कारण त्यांना पाच वर्षांची मुदत हवी असते, वारंवार निवडणूक लढवणे खर्चिक असल्याने परवडत नाही आणि निवडून येण्याची खात्री नसते. असे असले तरी मुलायमसिग, जयललिता आणि ममता बॅनर्जी हे तीन नेते मध्यावधी निवडणुकांना उत्सुक आहेत. कारण सध्या ते तिघेही आपापल्या राज्यात एवढे मजबूत आहेत की, आता मध्यावधी निवडणुका झाल्या तर या तिघात मिळून १०० खासदार निवडून येऊ शकतात. ही काही लहान शत्त*ी नाही. तेलुगु देसम आणि बिजद हेही त्याच मनःस्थितीत आहेत. भाजपाही अनाठायी पण त्याच मनःस्थितीत आहे. म्हणून कोळशाच्या राजकारणातून प्रचंड उलाढालीची शक्यता आहे.

Leave a Comment