राज्याला निधीची कमतरता पडू देणार नाही: पवार

पुणे: दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्र शासन महाराष्ट्राला निधीची कमतरता भासू देणार नाही; अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री शरद पवार यांनी दिली.

पुणे आणि नाशिक विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पवार बोलत होते. या बैठकीला जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार बबन शिंदे, जयदेव गायकवाड, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख उपस्थित होते.

राज्यातील आणेवारीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येईल; असे सांगताना पवार म्हणाले राज्यात जनावरांच्या चारा छावण्या आणि पिण्याचे पाणी याची पूर्तता करण्यासाठी कितीही खर्च आला तरी त्यासाठी केंद्र शासन राज्याला निधीचा पुरवठा करेल.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत दरवर्षी १०० दिवस रोजगार देण्याची तरतूद आहे. मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याने १५० दिवस रोजगार देण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक दृष्टीने विचार करेल; अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मुंबई हिंसाचाराबाबत गृहमंत्री आर्. आर. पाटील यांची पाठराखण केली. ते गृहमंत्री म्हणून उत्तम काम करीत असल्याचा निर्वाळा देऊन रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी उद्भवलेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचे प्रमाणपत्रही पवारांनी दिले.

Leave a Comment