झिरो फिगर हेच कुपोषणाचे कारण: मोदींची मुक्ताफळे

नवी दिल्ली: मध्यमवर्गीय महिलांमध्ये वाढीस लागलेली झिरो फिगर आणि कमनीय बांध्याची आस हेच कुपोषणाचे महत्वाचे कारण आहे; अशी मुक्ताफळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उधळली आहेत. एकीकडे पंतप्रधान मनमोहन सिंग कुपोषण ही राष्ट्राला शरमेची बाब असल्याचे नमूद करीत असताना मोदी यांचे हे विधान चांगलेच वादग्रस्त ठरण्याची लक्षणे आहेत.

मध्यमवर्गातील महिलांमध्ये सौंदर्याबाबत अधिक जागरूकता निर्माण होत असून झिरो फिगर किंवा कमनीय बांधा हे सौंदर्याचे महत्वाचे परिमाण ठरत आहे. त्यामुळे अशा महिला पौष्टिक आहार टाळतात. त्यामुळेच कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे; असे मोदी यांचे मत आहे.
युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार भारतात एकूण ६० लाख लोक कुपोषणग्रस्त आहेत. कुपोषणग्रस्तांमध्ये सर्वाधिक प्रमाण दारिद्र्यरेषेखालील लोकांचे आहे. विशेष म्हणजे गुजराथमध्ये कुपोषितांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. या राज्यातील ६ टक्के मुलांचा भूकबळी जात आहे तर तब्बल २२ टक्के जनतेला पुरेसे अन्न उपलब्ध होत नाही.

विकास पुरुष म्हणवून घेणार्‍या मोदी यांना ही आकडेवारी विचारात घ्यावी असे कुपोषणावर भाष्य करताना वाटलेले दिसत नाही.

Leave a Comment