ब्लॅकेमेलिंगच्या राजकारणावर चालते भाजपची रोजीरोटी : सोनिया

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट-कोळसाखाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी ’कॅग’ने ठेवलेला ठपका आणि त्या आधारावर भारतीय जनता पक्षाकडून होणारी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीच्या मुदद्यावर युपीए अध्यक्षा सोनिया गांधींनी भाजपवर मंगळवारी पलटवार केला. भाजप ब्लॅकमेलिंगचे राजकारण करीत असून, त्यावरच त्यांची रोजीरोटी चालते, असे वक्तव्य करून सोनियांनी भाजपवर हल्लाबोल केला.

भाजपने केलेल्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीपुढे काँग्रेस खासदारांनी दबावात येऊ नये, असे आवाहन सोनियांनी यावेळी केले.
कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदींनी पत्रकारांना सांगितले की, कोळसा घोटाळ्याप्रकरणी सोनिया गांधींनी पहिल्यांदा वक्तव्य केले आहे. आसाममधील परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. संपूर्ण देश दुष्काळाचा सामना करत असताना विरोधीपक्ष मात्र विनाकारण सरकारला वेठीस धरत आहे. त्यात भाजप ब्लॅकमेलिंगचे राजकारण करत असल्याचे सोनियांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींनी संसदेचे कामकाज वारंवार बंद पाडणार्‍या विरोधी पक्षांवर टीका केली. भाजपच्या नकारात्मक राजकारणाशी दोन हात करण्याचे काँग्रेस खासदारांना आवाहन केले.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने गेल्या पाच दिवसांत एकदाही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज चालु दिले नाही. आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी आपल्या खासदारांना केले. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणा. कोळसा घोटाळ्यात सरकारला ’मोठा माल’ मिळाला आहे, या सुषमा स्वराज यांच्या या वक्तव्यवरही सोनियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मनमोहनसिंग यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या वक्तव्यतून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदारांनी आतापासून तयारी सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेपर्यंत पोहचून त्यांना खरी माहिती देण्याची गरज आहे.