राज यांच्या नावाने भलत्यांचीच टीव टीव

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने ट्विटरवर १२ बोगस अकाऊण्ट्स सुरू असून संबंधितांनी ती त्वरित बंद करावी; असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

ट्विटरवर पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेली ६ बोगस अकाऊण्ट्स बंद करण्याचे आदेश वेबसाईटला दिले असतानाच राज ठाकरे यांच्या नावानेही अशी बोगस अकाऊण्ट्स सुरू असून त्यावरून विविध राजकीय विषयांवर टिप्पणी केली जात असल्याचे आढळून आले आहे. अनेकांना ती मते स्वत: राज यांचीच असल्याचे वाटून त्यांची दिशाभूल होत आहे.

ही बोगस अकाऊण्ट्स वापराणार्‍यांपैकी काही जण राज यांचे समर्थक असल्याची शक्यता गृहीत धरून मनसेने अधिकृत तक्रार केलेली नाही. मात्र इतरांच्या नावाने बोगस अकाऊण्ट्स तयार करणे आणि ती वापरणे हा गुन्हा असल्याने ती त्वरित बंद करावी; असे आवाहन मनसेने केले आहे.

राज हे थेट जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांच्या नावाने कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर अकाऊण्ट्स नसल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment